
सामना प्रतिनिधी । रहाता
जायकवाडीला पाणी देण्याच्या शासन निर्णयाविरोधात नगर जिल्ह्यातील नेते विखे, आमदार कोल्हे व काळे ही मंडळी त्यांच्या पातळीवर आंदोलने करून विरोध करीत असले तरी प्रश्न एक आहे. मग आंदोलने वेगवेगळी का? जिल्ह्याच्या भवितव्याच्या प्रश्नावर या नेते मंडळींनी एकत्र येवून प्रश्नाचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांसमोर मांडले पाहीजे. अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नसल्याची टिका माजी जि प सदश्य दिलीप रोहोम यांनी केली.
महाराष्ट्र सरकार व जलसंपदा विभाग यांचा जाहीर निषेध करण्यासाठी गोदावरी कालवे पाणी बचाव संघर्ष समितीने राहाता येथे आयोजीत केलेल्या जाहीर निषेध सभेत दिलीप रोहोम बोलताना म्हणाले आमच्यात मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचण्याची कुवत नसली तरी तालुका बंद करण्याची कुवत आहे. जिल्ह्यातील आमदारांच्या भेटी घेवून जायकवाडीला जाणारे पाणी थांबविण्याची विनंती करणार आहोत. २००५ मध्ये झालेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पुनर्लोकन झाले पाहीजे. नगर नाशिकचे लोकप्रतिनीधी कमी पडतात. कायदा केला तो बदलताही येतो. मात्र त्यासाठी सरकारकडे जनसामान्यांच्या प्रश्नांची चाड असायला हवी.
मराठवाड्यातील सर्व आमदार पाणी प्रश्नावर एकत्र येतात. मग नगर, नाशिकचे आमदार एकत्र का येत नाहीत. लोकप्रतिनिधींनी राजकीय जोडे बाजूला ठेवावे. आपण प्रथम शेतकरी आहोत याचे भान ठेवावे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. दिवाळी होते की नाही अशी परिस्थिती आहे. लोकांचे प्रपंच जळू लागलेत. आता तरी नेत्यांनी एकत्र येवून समन्यायी पाणी वाटप कायद्याविरोधात लढा दिला पाहीजे, असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे यांनी केले.
याप्रसंगी कालवे कृती समितीचे कॉ. राजेंद्र बावके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, भाजपाचे जेष्ट नेते गंगाधर चौधरी, साईबाबा संस्थानचे माजी विस्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड.नारायणराव कार्ले, अॅड.रघुनाथ बोठे, रावसाहेब गाढवे, गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहनराव सदाफळ, साहेबराव निधाणे, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे गंगाधर गमे यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सोपानकाका सदाफळ, राजेंद्र चौधरी, सदाशीव रोहम, सखाहरी सदाफळ, राजेंद्र कार्ले, सागर सदाफळ, विजय सदाफळ, कॉ एल एम डांगे, गंगाधर चौधरी, विठ्ठल शेळके, रावसाहेब गाढवे आदी प्रमुख उपस्थित होते.






























































