भाजप खासदार, आमदारांना काळे झेंडे दाखवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण सोलापुरातील पुंभारी येथे भाजपने आयोजित केलेला लाभार्थी संमेलनाचा कार्यक्रम संतप्त तरुणांनी उधळून लावला. यावेळी भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह मध्य प्रदेशचे माजी आमदार तथा सहप्रभारी जयभानसिंह पवेय्या यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपने कार्यक्रम आटोपून घेतला. या घटनेने पुंभारी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पुंभारी येथे भाजपने लाभार्थी संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे माजी आमदार तथा सहप्रभारी जयभानसिंह पवेय्या यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यापासून सोलापूर जिह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूरसह अनेक तालुक्यांतील शेतकरी, सभासदांमध्ये भाजपविरोधात तीव्र संताप आहे. येथील नागरिक भाजपाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना उघडपणे विरोध करत असल्याने वातावरण अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर पुंभारी येथे भाजपने लाभार्थी संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाला विरोध करत युवक काँग्रेसने निषेध आंदोलन केले. पुंभारी येथील उड्डाणपुलाजवळ भाजपाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, मध्य प्रदेशचे सहप्रभारी जयभानसिंह पवेय्या यांच्या गाडीचा ताफा आल्यानंतर काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. तसेच घोषणाबाजी करत तरुणांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिसांनी तरुणांवर लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.