
खार येथील एका ग्राहकाने कांदिवलीतील शोरूममधून नवीकोरी कार खरेदी केली; परंतु ही कार सदोष आणि दहा महिने जुनी असल्याचे समजताच ग्राहकाला धक्का बसला. त्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे धाव घेतली. या प्रकरणी ग्राहक संरक्षण कक्षाने मारुती सुझुकी कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेत संबंधित डीलरची फ्रँचायजी त्वरित रद्द करावी आणि सदोष कार बदलून द्यावी अशी मागणी केली. त्यावर कंपनीच्या प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिले आहे.
खार येथील करबीर सिंग नामक व्यक्तीने मारुती सुझुकी कांदिवली शोरूममधून गाडी बुक केली; परंतु ग्राहकाला गाडीचे पीडीआय म्हणजेच प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करू दिले नाही. ही गाडी दहा महिने जुनी आणि त्या गाडीचा पत्रा गंजलेला आणि अनेक ठिकाणी डॅमेज असल्याचे सिंग यांच्या निदर्शनास आले. याबाबत सिंग यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे दाद मागितली. शिवसेना नेते, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात मारुती सुझुकीचे विभागीय व्यवस्थापक रोशन शर्मा यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला.
या शिष्टमंडळात खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, लोकसभा समन्वयक संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक ऍड. उपेंद्र लोकेगावकर, संतोष कोठारी, राजेश चव्हाण, विजय पवार, अब्दुल वफाखान, शेखर यादव, धनराज गुंतूका, निशी भरेकर उपस्थित होते.
मारुती सुझुकीला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा दणका, डीलरची फ्रँचायजी त्वरित रद्द करा!
मारुतीचे डीलर व सब डीलर अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असतील तर अशा डीलर्सची फ्रँचायजी त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी या बैठकीदरम्यान करण्यात आली. तसेच सिंग यांना देण्यात आलेली सदोष गाडी त्वरित बदलून नवीन गाडी द्यावी असे शिष्टमंडळाने बैठकीत शर्मा यांना सांगण्यात आले. तसे न झाल्यास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडून संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात येईल त्याचबरोबर न्यायालयीन लढादेखील उभा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. सदर विषयात वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढू असे शर्मा यांनी आश्वासित केले.



























































