
>> श्रद्धा मोरे, [email protected]
प्रत्येक क्षेत्रात त्या त्या क्षेत्राला अभिप्रेत असणारे अर्थ निगडित शब्दांतून व्यक्त होतात. म्हणूनच काम करताना त्या क्षेत्राची भाषा अवगत असणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्राचीही अशी विशेष भाषा आहे. उद्योगक्षेत्रात यश मिळवायचे तर भाषेचे हे गणित कळायला हवेच.
भाषा हे मौखिक आणि लेखी अशा दोन्ही भाषेतील संवाद सुलभ करण्यासाठी समर्पित क्रियाकलापांचे क्षेत्र. अनेक बोली, अनेक भाषा प्रचलित आहेत. संवादाचे मुख्य माध्यम असणारी भाषा त्या त्या क्षेत्रानुसार स्वतंत्र बोली, शब्द यांच्यासह विकसित झाली आहे. त्या क्षेत्राला अभिप्रेत असणारे अर्थ या शब्दांतून व्यक्त होतात. म्हणून अशा विशिष्ट क्षेत्रात काम करताना ती भाषा अवगत असणे गरजेचे आहे. अशीच उद्योगक्षेत्राचीही विशेष भाषा आहे. उद्योगक्षेत्रात काम करताना भाषेचे हे गणित कळायला हवे.
उद्योग हा मराठी शब्द स्वतंत्रपणे करण्यात येणारे कार्य असा त्याचा अर्थ होतो. जुन्या काळात उद्योग फक्त अन्नधान्य देवाणघेवाणीपुरता मर्यादित होता. पण आता परिस्थितीनुसार व बदलत्या समाजजीवनानुसार उद्योग हा जागतिक पातळीवर गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरला आणि त्यानुसार उद्योगाची भाषा बदलत गेली. कोणताही उद्योग यशस्वीपणे पुढे न्यायचा तर त्यासाठी क्रियाकलापांचे योगदान महत्त्वाचे ठरते. क्रियाकलाप म्हणजे काय? तर क्रियाकलाप म्हणजे कोणतीही गोष्ट मार्गी लावण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करून केलेली कृती होय. उद्योगिक भाषेत क्रियाकलापात भाषांतर, दुभाषण, कोडिंग, डबिंग, शीर्षक, सॉफ्टवेअर, वेबसाईट, भाषेचे तंत्रज्ञान, सेवा, अनुवाद, संगणकीय ज्ञान, इत्यादीचा समावेश होतो. उद्योग उच्च पातळीवर नेण्यासाठी व उद्योग क्षेत्रात स्वतचा नवलौकिक मिळवण्यासाठी वरील क्रियाकलाप उपयोगी ठरतात. त्या अनुषंगाने उद्योग क्षेत्रात कायम चढाओढ आपल्याला अनुभवायला मिळते. वस्तू किती व कोणती विकताय ह्याहीपेक्षा ती कशाप्रकारे व कुठे विकताय याचे गणित कळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तरच उद्योग क्षेत्रातले कोडे सहज सोडवता येते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
संगणक माध्यमामुळे उद्योग क्षेत्र अधिक विकसित होऊ लागले. हल्ली तर उद्योगाची जाहिरात फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूब या माध्यम पटलावर मोठय़ा प्रमाणात केली जाते. यापैकी इनफ्लुन्सर मार्केटिंग जास्तच प्रचलित झालेय. या माध्यमातून एकाच वेळी लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य असल्याने याकडे उद्योजकांचा कल वाढताना दिसतो. हा सर्व विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे फोफावलेला एकप्रकारचा खेळच म्हणावा. पण याही पलीकडे उद्योगाची एक विशिष्ट भाषा आहे, ज्याची कल्पनाच कोणी करत नाही. या सगळ्या शर्यतीमध्ये प्रत्येक उद्योजक मी, माझा व्यवसाय, माझ्याच व्यवसायाची उलाढाल, माझ्याच कंपनीचा उच्चांक या भ्रमात राहतो व पुढे जाऊन स्पर्धेच्या चढाओढीत अशांच्या भ्रमाचा भोपळा फुटतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि पदरात नुकसान झेलावे लागते. कारण सुरुवातीच्या वेळेत मीपणा गिरवतो, अहंकार उफाळून येतो. या सगळ्याच्या मुळाशी अतिआत्मविश्वास घात करत असतो याकडे लक्ष नसते. म्हणून कोणत्याहो उद्योग क्षेत्रात त्याची भाषा जाणून घेऊन मगच तो उद्योग नेटाने पुढे नेला तर हे सर्व धोके टळू शकतात.
आता उद्योगाची नेमकी भाषा कोणती असा वाचकांना प्रश्न पडला असेलच तर अनुभवातून मिळालेल्या धडय़ांनी आम्हाला शिकवले की, उद्योगाची भाषा म्हणजे थँक यू, धन्यवाद, सॉरी, आभारी आहोत, क्षमा असावी, थोडं चुकलं हा माझं, बोहोत खूब, लाजवाब, मस्तच, खूप सुंदर, अप्रतिम, लाघवी, सुपर्ब, माफ करा, खूप छान, शुक्रिया, अभिनंदन व असे अनेक शब्द. हे छोटे शब्दसुद्धा तुम्हांला उद्योग क्षेत्रात मोठं करू शकतात. या शब्दांमुळे तुमच्या उद्योगात अडथळे न येता छान संबंध, संवाद तयार होऊन विचारांची, गुणांची, नवीन कल्पनांची शाब्दिक देवाणघेवाण वाढीस लागते.
हे सांगण्याचा खटाटोप यासाठी केला, कारण आपणच जर दुसऱयाला प्रोत्साहन दिले नाही, त्यांच्या कर्तृत्वाला शाबासकी दिली नाही, त्यांच्यातल्या काही चांगल्या गोष्टी अहंकार न ठेवता स्वीकारल्या तर तेच तुमच्याही बाबतीत दुसरे कोणीतरी नक्कीच करेल किंवा तसे वागेल यात शंकाच नाही.थोडक्यात उदाहरण द्यायचे तर, तुम्ही दुसऱयाचे भाषण ऐकत नसाल तर तुमचे भाषणसुद्धा कोणी ऐकणार नाही असेच काहीसे. एखाद्या गोष्टीला त्या त्या वेळेतच दाद द्यायला आपण शिकले पाहिजे, म्हणजेच मीपणा बोकाळणार नाही.
त्यामुळे उद्योग करणाऱयांनी एक कानमंत्र नक्कीच लक्षात ठेवा की, Marketing is engine of business & Decission is heart of business.
अगदी स्पष्ट सांगायचं तर, मोडेन पण वाकणार नाही अशी हवा डोक्यात न भरता वाकेन, पण मोडणार नाही अशी भूमिका ठेवली तर यश तुमच्या दाराशी असेल. यशाची ती दारं तुमच्यासाठी कधीच बंद होणार नाही आणि स्पर्धेच्या वादळातही तुमचा उद्योग भरभराटीला लागून न डगमगता तग धरून राहील.

























































