श्री दगडूशेठ दत्तमंदिर पुणे

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

पुण्यातील दत्तमंदिराचा आपणांस परिचय आहे. रास्तेवाडा सोमवार पेठेतील परांजपे यांचे दत्तमंदिर, हत्तीगणपती जवळील दत्तमंदिर, कर्वेरोड वरील वासुदेव निवासातील दत्तस्थान, कमला नेहरू- पार्क जवळील ‘श्रीगुरुदेव दत्तमंदिर’ अशी काही स्थाने महत्वाची आहेत. लक्ष्मीरस्त्यावरून पूर्वेस निघाल्यावर बेलबाग चौकात उजवीकडे वळल्यावर दगडूशेठ यांचे दत्तमंदिर येते या दत्ताची प्रसिद्धी फार आहे.

दगडूशेठ यांचे गुरू इंदूरचे माधवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हे मंदिर 1898 मध्ये तयार झाले. भाविकांना या मंदिराची ओढ नेहमीच असते मंदिरात तीनमुखी दत्ताची मूर्ती आहे. पुढे चांदीच्या पादुका आहेत. मंदिराचा कारभार विश्वस्तमार्फत चालतो गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणात होतो.

या मंदिराच्या निर्मितीमागे एक कथा आहे दगडूशेठ यांची दोन मुले निवर्तल्यावर त्यांना उदासीनता प्राप्त झाली. आपले कुळ अजरामर कसे होईल ? या चिंतेत ते होते. परंतु माधवनांथानी त्यांना गणपतीची मूर्ती स्थापन करण्यास सांगितले. पुढे यांच्या पत्नीने दत्तात्रेयांच्या मंदिराची स्थापना केली मूर्ती जयपूरहून आणली. या मंदिरामुळे दगडूशेठ यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे.

येथे रोज ठराविक वेळी होणारी पूजा अर्चा, वैदिक पठण व अनुष्ठाने या मुळे येथील पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झालेले आहे. येथे सध्या रुद्राभिषेक, दत्तायाग हेही करण्याची सोय दत्तभक्तांसाठी मंदिराने व्यवस्थापन केलेली आहे. पुण्यनगरीतील ही अतिशय पवित्र व प्रासादिक वास्तू आहे. येथील दत्तमूर्तीच्या दर्शनाने सर्व दत्तभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या