श्रीरांगोळी महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘रांगोळी’ या कलाप्रकाराने ज्यांना नावलौकिक मिळवून दिला त्या शिवराम बावडेकर ऊर्फ श्रीरांगोळी महाराज यांचा हा परिचय.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मालडी गावात राहणाऱ्या बावडेकर या दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात श्रीरांगोळी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळचे नाव शिवराम बावडेकर होते. मालडी येथे सुवर्णालंकार तयार करण्याचा वंशपरंपरागत धंदा नीटसा चालत नसल्याकारणाने बावडेकर मंडळी गगनबावडा येथे आली. करवीर कोल्हापूरनगरीच्या श्रीछत्रपती घराण्याचे सुवर्णालंकार तयार करण्याचे काम बावडेकरांकडे आले. वडिलांपाठोपाठ पुढे शिवराम यांनीदेखील त्यांच्या तरुण वयात श्रीछत्रपतींच्या घराण्याची नोकरी केली.

शिवराम यांचे मातापिता सात्त्विक वृत्तीचे होते, मात्र दुर्दैवाने त्यांना अकाली मरण आले. शिवराम आणि वामनराव हे दोन बंधू आणि दोन भगिनी अशा चारही भावंडांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र बालवयात हरपल्यामुळे या मुलांचा सांभाळ चुलतीने केला. शिवराम यांची मोठी बहीण सात्त्विक वृत्तीची होती. शिवराम आठ वर्षांचे असताना चुलतीसोबत श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला गेले तेव्हा तिथे सगुणावतारात नांदत असलेल्या श्रीस्वामी समर्थांनी शिवरामकडे पाहत त्याच्या चुलतीस विचारले, ‘हा मुलगा आम्हांस देता का?’ आणि छोटय़ा शिवरामला आपल्या मांडीवर बसवून कोल्हापूरच्या कुंभारगल्लीतील श्रीकृष्णसरस्वती यांची सेवा करावी अशी आज्ञा केली.

श्रीसमर्थांच्या आज्ञेनुसार शिवराम कोल्हापुरास जाऊन कुंभारगल्लीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी वास्तव्यास असलेल्या श्रीकृष्णसरस्वती दत्तमहाराज यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सेवेत रुजू झाले. पुढे काही काळातच शिवराम यांनी घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आणि स्वतःस सद्गुरूसेवेकरिता वाहून घेतले. ‘सद्गुरूसेवा ही सर्व सुखांची व भाग्याची जननी आहे’ असे सांगणाऱया शिवराम यांच्यातील विरक्तीचा बहर वाढत गेला. ते संसारात फारसे रमले नाहीत. श्रीकृष्णसरस्वतींचे त्यांच्यावर अपार प्रेम होते. त्यांनी शिवरामांना अनुग्रह दिला. श्रीगुरूंच्या आज्ञेने शिवराम यांनी त्यांना श्रीस्वामीरायांनी दिलेली भगवी कफनी घालून तीर्थयात्रेस प्रारंभ केला. श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या प्रेमळ सान्निध्यात राहिल्याने शिवराम यांना अल्पावधीतच दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले.

सद्गुरूंना अपेक्षित असलेला शिवराम बावडेकर यांच्या आध्यात्मिक साधनेचा प्रवास उत्तमरीत्या सुरू होता त्यासोबतच त्यांच्यामधील कलाकारही तितक्याच जोमाने कार्यरत होता. शिवराम उत्तमप्रकारे रांगोळ्या काढत असत. त्यांचे रांगोळी काढण्याचे कसब आणि प्रावीण्य इतके जबरदस्त होते की, रांगोळी काढण्यासाठी घरातील अंगणाचा भागही त्यांना पुरेनासा झाला. त्यांनी कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर रांगोळी काढण्यास सुरुवात केली. दोन्ही खांद्यावर रांगोळ्यांनी भरलेल्या मोठय़ा झोळ्या घेऊन शिवराम दोन्ही हातांच्या मुठीत रांगोळी घेऊन चालताचालता सहजच रस्त्यावर फेकत असत आणि त्यातूनच पाहणाऱयांच्या नजरेचे पारणे फेडणारी अतिशय आकर्षक चित्रकृती तयार होत असे. शिवरामांच्या उत्स्फूर्तपणे साकारलेल्या या अफलातून रांगोळीची बातमी कोल्हापूरच्या राजघराण्यापर्यंत पोहोचली नसती तर नवलच. त्यामुळे श्रीछत्रपतींच्या मिरवणुकीपुढे रांगोळी घालण्यासाठीही शिवराम यांना बोलावणे येऊ लागले. करवीरनिवासिनी आई महालक्ष्मीच्या रथापुढे, श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या पालखीसमोर, मोठमोठय़ा समारंभात, धार्मिक उत्सवात, सण-सोहळ्यात शिवराम यांनी साकारलेली रांगोळी हा त्या उत्सवाचा अविभाज्य भाग बनला. कोल्हापूरच्या राजघराण्यातील एका विवाहप्रसंगी वरातीच्या दीड मैल अंतरावर घातलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी शिवराम यांना राजदरबारातून ‘रांगोळी महाराज’ हा किताब मिळवून दिला.

गोवा येथे त्याकाळी काही कारणांवरून हिंदूधर्मीयांच्या मंदिरावर निर्बंध घातले होते. तेव्हा पणजी शहरातील मुख्य चौकात रांगोळी महाराजांनी आपल्या रांगोळीतून ‘क्रूसावर चढलेला येशू ख्रिस्त’ साकारला. त्यांची जिवंत भासणारी कलाकृती पाहून येणारी-जाणारी मंडळी थक्क झाली असली तरी चारही बाजूने येणारी वाहने थांबून राहिली. एकही वाहन येशू ख्रिस्ताच्या रांगोळीवरून पुढे गेले नाही कारण त्यातील बरेचजण ख्रिश्चन होते. हा वृत्तांत तेथील मुख्याधिकाऱयाच्या कानावर जाताच तो ताबडतोब घटनास्थळी आला. येशू ख्रिस्तांचे रांगोळीतून साकारलेले चित्र पाहून तोही थक्क झाला, मात्र वाहतुकीचा झालेला खोळंबा पाहून त्याने महाराजांपाशी रांगोळी पुसण्याची विनंती केली. तेव्हा महाराजांनी त्यांना ‘रांगोळीतील येशू ख्रिस्तावरून खुशाल वाहने न्यावी!’ असे उत्तर दिले. हा भलताच पेच उद्भवला तेव्हा मात्र रांगोळी महाराजांनी पुढे होत त्या मुख्याधिकाऱयाला ‘आम्हा हिंदूधर्मीयांच्या मंदिरावर घातलेले निर्बंध काढून टाका.’ असे सुनावले तेव्हा लागलीच त्याने महाराजांचे म्हणणे मान्य केले त्यानंतरच रांगोळी पुसण्यात आली. पुढे गोव्यातील हिंदूधर्मीय मंदिरांवरील निर्बंध उठविण्यात आले.

शिवराम बावडेकर तथा श्रीरांगोळी महाराज यांनी आपल्यातील निसर्गदत्त कलेचा उपयोग कधीही अर्थार्जनासाठी केला नाही. आपल्या हातून साकारलेली रांगोळी, पाहणाऱयाला आनंद देते आणि म्हणूनच ही ईश्वरसेवा आहे असे ते नेहमी सांगत असत. रांगोळी महाराजांचा उदरनिर्वाह जेमतेम चालत असे. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी अशा चारजणांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, मात्र स्वतःच्या प्रपंचामध्ये फार काळ न रमलेल्या रांगोळी महाराजांनी ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना स्वीकारत जग व जनकल्याणाचा विचार केला. विश्वबंधुत्वाची कल्पना त्यांना अतिशय प्रिय होती. स्वतःविषयी बोलताना ते नेहमी ‘हे शरीर केवळ परोपकारासाठी आहे’ असे सांगत. लग्न आणि संसार करूनही त्यात मन न रमवता रांगोळी महाराजांनी संन्यस्तवृत्तीने राहून जगाचा संसार चालवण्याकडे प्राधान्य दिले.

श्रीरांगोळी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अतिशय भारदस्त होते. त्यांना अतिशय उंचापुरा आणि भव्य देह लाभला होता. श्रीस्वामी समर्थांकडून भगवी कफनी प्राप्त झाल्यानंतर ते कायम भगवी वस्त्रे परिधान करू लागले. त्यांच्या गोऱया देहावर भगवे वस्त्र आणि फेटा ही वेशभूषा शोभून दिसत असे. श्रीरांगोळी महाराजांचे डोळे पाणीदार होते आणि त्यांच्या चेहऱयावरील तेज इतके विलक्षण होते की, ते रस्त्याने चालत निघाले असता डौलदार चालीमुळे ते जाणाऱया-येणाऱयांचे लक्ष वेधून घेत असत. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर चांगलीच छाप उमटत असे. 1924 साली श्रीरांगोळी महाराज शिरोडा येथे आले असताना तेथील स्थानिक रहिवाशांचा ते ‘गुप्तहेर’ असावेत असा समज झाला होता. गंमत म्हणजे, गोव्यातील पोलीसही त्यांना ब्रिटिशांचे ‘गुप्तहेर’ समजत असत. (पूर्वार्ध)

[email protected]