श्रीशंकर महाराजांना भजनकीर्तनाची आवड होती. भजन, कीर्तन व गायनसंगीताच्या कार्यक्रमांना श्रीमहाराज आवर्जून जात असत. त्या काळातील अव्वल शास्त्राrय गायिका यल्लूबाई माने आणि संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक-नट बालगंधर्व यांचे गायन ऐकताना श्रीमहाराजांची भावसमाधी लागत असे. सोलापुरातील मुक्कामात शुभराय मठाच्या जनुबुवांचे गायन तसेच पुणे मुक्कामात ताईसाहेब मेहेंदळे यांचे कीर्तन ऐकणे श्रीमहाराजांच्या विशेष आवडीचे होते. अशा प्रसंगात अनेकदा ते तन्मय होऊन नाचू लागल्याचे, तर काही प्रसंगात उपस्थित भक्तांना प्रिय असलेल्या त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवतांचे दर्शन श्रीमहाराजांनी घडविल्याच्या आठवणी आहेत.
श्रीमहाराजांचे एक भक्त जनार्दनबुवा सोनवणे यांनाही गायनाची विलक्षण आवड होती. भजनामध्ये तासन्तास रंगून जाणारे जनार्दनबुवा संतश्रेष्ठांच्या अभंगरचना बहारदारपणे सादर करीत. त्यांच्या भजनातील परमानंद उपभोगण्यासाठी भक्तमंडळी आवर्जून उपस्थित राहात असत. श्रीमहाराजांस लहर आली की ते थेट जनार्दनबुवांकडे जात अन् भजन रंगात आले की, तल्लीन होऊन देहभान हरपून नाचू लागत. भगवंतभक्तीत सचैल न्हायलेल्या श्रीमहाराजांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळतानाचे दृश्य अनेक भाग्यवंतांनी पाहिलेले आहे. याच कारणाने, श्रीमहाराजांचे सान्निध्य-सहवास लाभलेल्या जनार्दनबुवांच्या लेखणीने अवीट गोडीची अनेक भक्तिगीते लिहिली गेली.
श्रीमहाराजांना अभंग व गौळणी विशेष प्रिय होत्या. संबंधित भक्तांना ते पुनः पुन्हा अभंग व गौळणी म्हणावयास सांगत असत. ‘परब्रह्मा निष्कामा तो हा गौळिया घरी। बाक्या बाळे अंदुकृष्ण नवनीत चोरी।’ ही त्यांची आवडती गौळण ऐकताना श्रीमहाराज प्रत्येक खेपेस देहभान विसरून जात. अशा प्रसंगी श्रीमहाराजांमध्ये भगवान श्रीकृष्णाची विविध रूपे प्रकट होत असत असे अनेक प्रत्यक्षदर्शी भक्तांनी नोंदविले आहे. या गौळणीप्रमाणेच श्रीमहाराज, त्यांना प्रिय असलेला ‘धरिला पंढरीचा चोर। गळा बांधूनिया दोर। हृदय बंदिखाना केला। आत विठ्ठला कोंडिला।’ हा जनाबाईंचा अभंग त्यांच्या भक्तांना, विशेषतः ताईसाहेबांना नेहमी आणि आवर्जून म्हणावयास सांगत असत.
नगरच्या भक्तमंडळींनीदेखील श्रीमहाराजांच्या भजन-कीर्तनाची आवड आत्मीयतेने जोपासली होती. याविषयी नगरकर भक्तांनी नोंदवलेली एक हृदय आठवण पुढीलप्रमाणे आहे. मूळचे चित्रकूट करवी इथले, मात्र पुढे इंदूर येथे नाथसंप्रदायाच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून विराजमान झालेले थोर सत्पुरुष श्रीमाधवनाथ महाराज हे आध्यात्मिकता आणि योगसाधनेसोबत उत्तम संगीतज्ञ म्हणूनही विख्यात होते. ते अप्रतिमरीत्या मृदंग वाजवीत असत. एकदा श्रीमहाराज आणि शुभराय मठातील जनुबुवांचा मुक्काम डॉ. धनेश्वर यांच्या घरी झाला असता तेथे श्रीमाधवनाथ महाराजांचेही येणे झाले. या सर्वांच्या संगीतविषयक गप्पा चालल्या असता श्रीशंकर महाराजांनी जनार्दनबुवांना गाण्याचा आग्रह केला आणि श्रीमाधवनाथ महाराजांना मृदंगसाथ करण्याची विनंती केली.
जनार्दनबुवा उत्तम गायक होते. त्यांनी गायनास प्रारंभ केला तेव्हा, त्यांना ऑर्गनवर साथ करण्यासाठी सरदार नानासाहेब मिरीकर पुढे सरसावले अन् श्रीमाधवनाथ महाराज मृदंग वाजवते झाले. ही मैफल जवळपास पाच प्रहर चालली. भक्तमंडळी तल्लीन होऊन ऐकत होती. श्रीमहाराजांमुळे उपस्थितांना स्वर्गीय गाणे म्हणजे काय याचा प्रत्यय त्या दिवशी उमगला. श्रीमहाराज नेहमीच म्हणत असत की, ‘देवाधिदेव महादेव हा संगीताचा भोक्ता आहे, त्यामुळे ‘संगीत’ हाच त्या शंभूमहादेवापाशी पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.’
श्रीमहाराजांचे नगरातील एक भक्त आणि प्रसिद्ध वकील रावबहादूर नवले हे इंदूरच्या या श्रीमाधवनाथ महाराजांचे शिष्य होते. एकदा रावबहादूर नवले श्रीशंकर महाराजांच्या दर्शनास आले असता श्रीमहाराजांच्या ठिकाणी त्यांना श्रीमाधवनाथांचे दर्शन घडले. तेव्हा ‘आपण व श्रीमाधवनाथ हे एकच असल्याचा’ प्रत्यय दिल्याने, रावबहादूर नवले यांची श्रीमहाराजांवरील भक्ती अधिकच वाढली.



























































