श्री शंकरगाथा  : नाथपंथीचा योगी

>> चैतन्यस्वरूप

श्रीशंकर महाराज एकदा भक्त अभ्यंकर यांच्या पुण्यातील घरी मुक्कामास असता त्यांना अचानक म्हणाले, ‘अंतापूर येथे दावलमलिक दर्गा आहे. तो कुठल्याही पीरबाबाचा दर्गा नसून साक्षात श्रीमच्छिंद्रनाथांचे स्थान आहे. यवन राजवटीपासून ‘दावलमलिक’ नावाने ते स्थान  ओळखले जाते. हे स्थान अदमासे 2000 वर्षांपूर्वीचे आहे असे साक्षात श्रीमच्छिंद्रनाथांचे सांगणे आहे.’’

एकदा श्रीमहाराज त्यांच्या काही भक्तांसमवेत नाशिक येथे आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, कुशावर्ततीर्थ तसेच ब्रह्मगिरी येथील श्रीनिवृत्तीनाथांच्या समाधीला आणि श्रीगहनीनाथ यांच्या वास्तव्यस्थानाला भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसार, सर्वजण श्रीमहाराजांसह दर्शनार्थ निघाले. सर्व ठिकाणी यथायोग्य दर्शन झाल्यावर मंडळी श्रीगहनीनाथांच्या दर्शनार्थ निघाली. श्रीमाऊलींचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवृत्तीनाथ यांचे गुरू व नाथ संप्रदायातील प्रमुख सिद्धपुरुष श्रीगहनीनाथ यांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्त मंडळींना श्रीमहाराज एकाएकी म्हणाले, ‘‘तुम्हांला कुणालाही श्रीगहनीनाथांकडे जाण्याची गरज नाही. कारण आज रात्री गहनीनाथ साक्षात इथेच येतील.’’

श्रीमहाराजांच्या या बोलण्यावर काही भक्त मंडळींचा विश्वास बसला नाही याचे कारण श्रीगहनीनाथ हे त्रैलोक्यात सहजसंचार करणारे अन् नवखंड पृथ्वीस व्यापून राहिलेले असे अलौकिक नाथ संप्रदायी सिद्धपुरुष होते. श्रीमहाराजांची आणि श्रीगहनीनाथांची प्रत्यक्ष गाठभेट होणे सहजशक्य आहे. मात्र आपल्यासमान सर्वसामान्य भक्तांना दर्शन देण्यास ते स्वतः कसे येतील अशी प्रामाणिक शंका काही भक्तांच्या मनात आली. मात्र ती उघडपणे व्यक्त न करता त्या सर्वांनीच श्रीमहाराजांच्या बोलण्याला मूक संमती दिली.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी सर्वांचा मुक्काम झाला. तो दिवस सर्वांनी भजन, कीर्तनात घालविला. सायंकाळ सरली अन् काही क्षणांतच रात्र भरात आली. श्रीमहाराजांनी उपस्थित भक्तांना मध्यरात्र होईपर्यंत जागते ठेवले. वातावरणात निःशब्द शांतता पसरली होती. अवतीभोवतीचा आसमंत चिडीचूप झाला होता अन् अशातच एकाएकी श्रीमहाराजांभोवती जमलेल्या सर्व भक्तांना प्रचंड मोठा पायरव आपल्या दिशेने येत असल्याचे जाणवले आणि त्यापाठोपाठ ‘अल्लख’ अशी कर्णभेदक आरोळी कानावर येताच सर्वांचेच धाबे दणाणले. त्या कीर्र अंधारात व शांत वातावरणात एकाएकी प्रकटलेला तो ‘दैवी’ स्वर कानी येताच भक्त मंडळी कमालीची भयभीत झाली. श्रीमहाराजांना तिथेच सोडून ते सर्व दुसऱ्या खोलीत गेले आणि तोंडावर पांघरुण ओढून बसले. श्रीमहाराज तिथेच शांतपणे बसून राहिले होते. इतक्यात, दरवाजातून आत येणाऱ्या एका नाथपंथीय सत्पुरुषाची सावली बाजूच्या खोलीतील भक्त मंडळींनी पाहिली. इतकेच नव्हे तर जिथे श्रीमहाराज बसले होते ती खोली त्या रात्रीच्या काळोखी अंधारातही अपार तेजाने न्हाऊन गेल्याचेही अनुभवले. भयचकित झालेल्या त्या सर्वांनी श्रीमहाराजांचा धावा करीत तेथेच बसून राहणे पसंत केले. तो सिद्धयोगी आणि श्रीमहाराज यांचे अगम्य भाषेत संभाषण चालले होते. अशातच पहाट झाली.

काही काळानंतर, श्रीमहाराज उठले व शेजारच्या खोलीत येऊन त्या सर्वांना ‘‘एवढे घाबरलात का?’’ असे विचारते झाले, तेव्हा त्या मंडळींनी घडला प्रकार सांगितला. त्यावर श्रीमहाराज हसले आणि म्हणाले, ‘‘मी तुम्हांला सांगितले होते, की कुणालाही श्रीगहनीनाथांकडे जाण्याची गरज नाही. कारण तेच रात्री साक्षात इथे येतील आणि त्याप्रमाणे ते आले आणि पहाटेपर्यंत माझ्याशी बोलत बसले. तुम्ही मात्र त्या सिद्धाच्या दर्शनापासून वंचित राहिलात. माझ्यावर विश्वास ठेवला असता तर तुम्हाला श्रीगहनीनाथांचे ‘साक्षात’ दर्शन घडले असते.’’

असेच एकदा श्रीमहाराज माळीनगर येथील शुगर फॅक्टरीमध्ये जाऊन तिथला बॉयलर हातोडय़ाचे घण घालून पाडू लागले. हे दृश्य पाहून श्रीमहाराजांचे तेथील भक्त व उपस्थित मंडळी चकीत झाली. तेव्हा श्रीमहाराजांनी त्या बॉयलरच्या खालून श्रीगहनीनाथांच्या स्वयंभू पादुका बाहेर काढल्या आणि त्यांची फॅक्टरीच्या आवारामध्ये विधिवत स्थापना केली. आजही ते स्थान भक्तदर्शनार्थ उपलब्ध आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या