
सामना ऑनलाईन । नगर
नगरमधल्या पवननगर येथील श्रीराम व हनुमान मंदिरात रामनवमी निमत्त पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘प्रभू श्रीरामाच्या जयघोषात, तुतारी, टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत बँड, भालदार-चोपदार, अब्दागिरी, छत्री, भगवे ध्वज अशा लवाजम्यासह भजनी मंडळी अत्यंत भक्तिभावाने पालखीत सहभागी झाले होते.
रामनवमी निमित्त पवननगरहून निघालेली पालखी, गोकुळनगर, साईराम नगर, कुशबा नगरी, तुळजानगर, नंदनवन नगर मार्गे ही पालखी पुन्हा श्रीराम मंदिरात पोहोचली. सुरुवातीला श्रीराम मंदिरात पूजा झाली. फुलांनी सजवलेली पालखी श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या निवासस्थानापासून पुढच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक मार्गावर महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. यावेळी नागरिकांकडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. या पालखीत ह.भ.प. संदीप महाराज खोसे, ज्ञानदेव दारकुंडे, राजन पोहेकर, संतोष कुलकर्णी, चंद्रकांत दगडे, शिरीष कुलकर्णी, रमेश म्हस्के, नंदकुमार कुलकर्णी, विश्वासराव देशमुख यांच्यासह श्रीराम सेवा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळे व परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

























































