
नगर-संभाजीनगर महामार्गालगतच्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा बहिरोबा शिवारातील एका हॉटेलमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर-संभाजीनगर शिवारातील एका हॉटेलमागे काही इसम हे अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिटके यांनी अधिकारी, अंमलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्यासमवेत पुरवठा विभागातील कर्मचाऱयांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. या छाप्यात एक टेम्पो, भारत गॅसचे 91 मोकळे व्यावसायिक गॅस सिलिंडर, एक घरगुती गॅस सिलिंडर, टेम्पोमध्ये भरलेल्या 35 व्यावसायिक गॅस सिलिंडरसह गॅस रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ, कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
































































