
विराट कोहलीच्या दमदार 93 धावांच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डेत 301 धावांचे आव्हान 4 विकेट राखून गाठले आणि मालिकेत 1–0 अशी आघाडी घेतली. 91 चेंडूंतील या खेळीत विराटने 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत विजयाचा पाया रचला. ऑक्टोबर 2025 नंतर वन डेत त्याची ही सलग सातवी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी ठरली असून, या काळात त्याने तीन शतके झळकावली आहेत.
या कामगिरीवर श्रेयस अय्यरने विराटचे तोंडभरून काwतुक केले. बीसीसीआयच्या व्हिडीओत अय्यर म्हणाला, विराटबद्दल जे काही बोलाल ते कमीच आहे. वर्षानुवर्षे त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, स्ट्राइक रोटेशन आणि गोलंदाजांना सामोरे जाण्याची क्षमता विलक्षण आहे. तो जे बोलतो, तेच करून दाखवतो.
दरम्यान, संघात पुनरागमन केल्याचा आनंद व्यक्त करत श्रेयस अय्यरने ही विजयाने झालेली सुरुवात मालिकेसाठी शानदार असल्याचे सांगितले. संघात पुनरागमन करून ड्रेसिंग रूम शेअर करणे खूप छान वाटतंय. हे क्षण मी खूप मिस करत होतो, असे अय्यर म्हणाला.





























































