
‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जुनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस तळपदे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाइन असणाऱया अॅक्शन थ्रिलर अशा या चित्रपटाचे कथानक अनपेक्षितरीत्या उलगडणार आहे. चित्रपटात कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत असून सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली असून या चित्रपटाच्या माध्यमातून ते बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच ‘अजाग्रत’ मधील राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हिंदीसह सात वेगवेगळय़ा भाषांमध्ये प्रदर्शित होणारा श्रेयस तळपदेचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.