
सामना ऑनलाईन । मथुरा
करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्रीकृष्ण हे देव आहेत का, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे बर्थ सर्टिफिकेट आहे का अशी विचारणा एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने (आरटीआय) मथुरा जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबतची माहिती द्या अशी मागणीही केली आहे.
माहिती अधिकार कायद्याचा वापर करून देशातील भ्रष्टाचार अधिकाऱयांची महत्त्वाची माहिती मागविण्यात येते, मात्र छत्तीसगडमधील बिलासपूर येथील जैनेंद्रकुमार गेंदले या ‘आरटीआय’ कार्यकर्त्याने चक्क श्रीकृष्णाची माहिती मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 3 सप्टेंबरला देशभरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुट्टी जाहीर करून श्रीकृष्णाचा जन्मदिन साजरा केला गेला. त्यामुळे श्रीकृष्णाचे बर्थ सर्टिफिकेट आहे का? असेल तर ते देण्यात यावे. श्रीकृष्ण खरंच देव आहेत का? देव असतील तर ते कसे? देव असण्याचे निकष काय आहेत? त्याला काय आधार आहे, असे प्रश्न उपस्थित करून ‘आरटीआय’मधून माहिती द्यावी असे गेंदले यांनी म्हटले आहे.
गेंदले यांच्या धार्मिक प्रश्नांवर काय उत्तर द्यावे यावर जिल्हा प्रशासन विचार करीत आहे. याबाबत मथुरेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश चंद्र म्हणाले, हिंदू धर्माशी संबंधित सर्व ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये श्रीकृष्णाच्या जन्माविषयी माहिती देण्यात आली आहे. कृष्णाचा जन्म द्वापारयुगात तत्कालीन शौरसेन (आताची मथुरा) येथे झाला. श्रीकृष्णाने राजा कंसचा वध करण्यासह द्वारका सोडण्यापूर्वी हा पूर्णपणे धार्मिक आस्थाशी निगडित विषय आहे.

























































