
श्रीमहाराज त्यांच्या निवडक भक्तमंडळींसह विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत असत. अनेक भक्तांना त्यांच्या इष्ट देवतेच्या स्वरूपात दर्शन देत असत. गावोगावी विविध संतमहंतांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात पुढाकार घेत असत. ग्रंथ-पारायण सप्ताह, कीर्तन, प्रवचन आणि भजनादी उपक्रमांमुळे उत्सवाला भाविकांची गर्दी होत असे. सोहळा समाप्तीच्या निमित्ताने भंडारा आयोजित करण्याकडे श्रीमहाराजांचा कल होता. भंडाऱ्याच्या निमित्ताने हजारो भक्त महाप्रसादाकरिता येत असत, या सर्व उठाठेवीमागे श्रीमहाराजांचा ‘समाजात एकोपा राहावा, आपआपसातील पंक्तिप्रपंच नष्ट व्हावा, जातीयतेचे निर्मूलन व्हावे आणि समाजातील सर्व घटक एकदिलाने राहावे’ हा हेतू असे.
श्रीशंकर महाराजांचे अवतारकार्य गोरगरीब आणि सतत नाडल्या जाणाऱ्या दीनदुबळ्या समाजासाठी घडले. त्यांच्या मनांत समाजातील सर्व घटकांविषयी विलक्षण करुणा अन् कमालीची आस्था होती. कुणी भक्त आजारी असल्याचे समजताच श्रीमहाराज त्याची विचारपूस करीत असत तेव्हा श्रीमहाराजांच्या सान्निध्यानेच ती आजारी व्यक्ती बरी होत असे. श्रीमहाराज त्यांच्या भक्तांना झालेल्या असाध्य रोगांवर अनेकदा उपाय सांगत असत आणि उपचारही करीत असत. विविध वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधी उपाययोजनांची माहिती लिहून ठेवलेली वही श्रीमहाराजांनी एकदा त्यांचे भक्त अण्णा पानसरे यांना दाखविली असल्याचे अण्णा सांगत असत.
श्रीमहाराजांच्या निस्सीम भक्तांपैकी एक आणि मुंबई येथे राहावयास असलेल्या वासुदेव बांबोर्डीकर यांना पोटदुखीच्या त्रासाने हैराण केले होते. बरेचसे डॉक्टर झाले, वैद्य झाले तसेच विविध बाह्योपचारही करून झाले; परंतु कुणाचाही व कशाचाही उपयोग होईना. अखेरीस एका निष्णात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बांबोर्डीकरांना पोटदुखीसाठी ऑपरेशन करण्याखेरीज गत्यंतर नसल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून बांबोर्डीकर यांना धक्का बसला, मात्र श्रीमहाराजांवर भरवसा ठेवून ते ऑपरेशनसाठी होकार देते झाले.
दुदैवाने, ऑपरेशनच्या आदल्या रात्री बांबोर्डीकरांच्या पोटात दुखू लागले. प्राणांतिक वेदना होऊ लागल्यामुळे बांबोर्डीकर गडाबडा लोळू लागले. तेवढय़ात कुणीतरी सतत आपली पाठ दाबत असल्याचा त्यांना भास झाला. काही क्षणांतच पोटदुखीमुळे येणाऱ्या कळा थांबल्या आणि बांबोर्डीकरांना हायसे वाटू लागले. काही काळ विश्रांती घेण्याच्या दृष्टीने पहुडलेल्या बांबोर्डीकरांच्या कानाशी एक आवाज ऐकू आला, ‘ऑपरेशन करून घे. निश्चितच बरा होशील.’ हा आवाज श्रीशंकर महाराजांचा आहे हे बांबोर्डीकरांनी ओळखले.
दुसऱ्या दिवशी बांबोर्डीकर ऑपरेशन थिएटरमध्ये असताना श्रीमहाराज तेथे स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी बांबोर्डीकरांच्या आईला धीर दिला. पुढे ऑपरेशन व्यवस्थितरीत्या पार पडले आणि बांबोर्डीकर सुखरूप घरी परतले. पुढे काही दिवसांनी बांबोर्डीकर श्रीमहाराजांच्या दर्शनास गेले असता श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘डॉक्टरांनी तुझ्या डाव्या हातावर इंजेक्शन दिले आणि 9 डिसेंबरला ऑपरेशन केले.’ आणि त्यांनी आपला सदरा वर केला तेव्हा त्यांच्या पोटावर असलेल्या ऑपरेशनच्या खुणा पाहून बांबोर्डीकरांच्या डोळ्यात पाणी आले.
श्रीमहाराज लहानग्या बालकांसोबत खेळत असत, त्यांच्याशी बोलत असत. याविषयी काही भक्तांनी श्रीमहाराजांना विचारले असता ते म्हणाले, ‘मुले पवित्र असतात, निष्पाप असतात. त्याचे अंतःकरण शुद्ध असते. कोणतीही इच्छा न धरता ती वावरतात. त्यांच्या वागण्यात निर्मळता असते. त्यांना काही हवे आहे म्हणून ते माझ्याजवळ येत नाहीत. तुम्ही सर्व स्वार्थासाठी आणि काही ना काही अपेक्षा घेऊन येथे येता. मनांत विशिष्ट हेतू ठेवून माझ्याशी वागत असता. तुमचे वर्तन संधीसाधूपणाचे आहे. मात्र या लेकरांचे तसे नाही. ती निर्मळ आहेत.’
श्रीमहाराजांचे दिव्य रूप न ओळखणारे अनेक जीव त्या काळात होते. त्यातील काहींनी श्रीमहाराजांना भ्रष्ट करण्याच्या हेतूने काही गणिकांना त्यांच्याकडे पाठविले, तेव्हा श्रीमहाराज त्या गणिकांना ‘बाल’ रूपात दिसल्याने त्यांनी तात्काळ श्रीमहाराजांची माफी मागितली.






























































