श्री शंकरगाथा : समर्थ अवतार

>> चैतन्यस्वरूप

तात्या सहस्रबुद्धे आणि गणेशन हे दोघे व्यावसायिक भागीदार होते. एकदा गणेशन यांना दृष्टांत झाला की, श्रीअक्कलकोट स्वामीमहाराजांचा अवतार सध्या मुंबई येथे आहे शिवाय या दृष्टांतामध्ये त्यांना श्रीशंकर महाराजांचे दर्शनही घडले. गणेशन यांनी तात्यांना स्वप्नदृष्टांताविषयी सांगितले, त्याचा छडा लावण्याकरिता ते दोघे उभयतां मुंबईस निघाले. स्वप्नात दिसलेले स्थान श्रीस्वामीसमर्थ मठाशी निगडित असावे असे गृहीत धरून त्या दोघांनी मुंबईतील श्रीस्वामीमठांना भेट दिली असता त्यांना गिरगावच्या कांदेवाडी येथील मठामध्ये एक चित्रकार श्रीशंकर महाराजांचे चित्र रंगवीत असल्याचे दिसले. ते चित्र पाहताच गणेशन म्हणाले, ‘दृष्टांतात दिसलेला श्रीस्वामीमहाराजांचा अवतार हाच आहे.’ ते दोघेही तिथे असतानाच एका गाडीतून श्रीमहाराज आले आणि लगबगीने मठात येऊन आपले चित्र घेऊन निघाले. त्यांची ओळख पटताच तात्या आणि गणेशन त्यांचा पाठलाग करू लागले. श्रीमहाराज तेथून निघाले आणि एका घरामधील माडीवरच्या खोलीत जाऊन त्यांनी दरवाजा आतून बंद केला. तात्या आणि गणेशन पाठोपाठ तिथवर गेले, मात्र त्यांनी बऱ्याच हाका मारूनदेखील श्रीमहाराज दरवाजा उघडेनात. तेव्हा, आपल्याला झाले तितके दर्शन श्रीमहाराजांना घडवायचे होते अशी मनाची समजूत करून घेत गणेशन तिथून निघून गेले, मात्र तात्या सहस्रबुद्धे दरवाजात ताटकळत उभे राहिले. थोडय़ा वेळाने श्रीमहाराजांनी दरवाजा उघडला आणि ‘अरे तात्या, आत ये. मी तुझीच वाट पहात होतो.’ असे सांगत तात्यांना घरात घेतले. तात्यांनी लागलीच श्रीमहाराजांचरणी लोटांगण घातले.

तात्या सहस्रबुद्धे यांच्यावर श्रीमहाराजांची अपार कृपा होती. एकदा श्रीमहाराज रेल्वेमार्गे निघाले आणि बिलिमोरा स्टेशनात उतरून थेट एका कारखान्याच्या आवारात जाऊन उभे राहिले. येथे तात्यांचे नित्य येणेजाणे होत असे. श्रीमहाराजांनी कारखान्याच्या आवारात एका वृक्षाखाली खोदकाम करावयास सांगितले. श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार केले असता जमिनीतून दगडी पादुका प्राप्त झाल्या. त्या पादुकांची तेथे स्थापना करून श्रीमहाराज आल्यापावली निघून गेले. सध्या त्या जागेवर श्रीदत्तात्रयांचे मंदिर उभारलेले असून तेथील छोटेखानी मंदिरात श्रीस्वामीसमर्थांची तसबीरही स्थापन केलेली आहे. येथे दत्तसंप्रदायी सत्पुरुष श्रीरंगावधूत यांचे येणे झाले होते.

हिवाळ्याचे दिवस होते. सोलापूर मुक्कामी असताना श्रीमहाराजांना थंडी वाजू लागली म्हणून ते जनार्दनबुवांस म्हणाले, ‘मी खोलीत शौचास बसतो. खोलीस कुलूप लावा. होणारी घाण मुळीच काढू नका.’ श्रीमहाराजांचे हे असे वागणे पंधरा दिवस चालले होते. त्या नंतर एकेदिवशी श्रीमहाराज खोलीस कुलूप घालून बाहेर येऊन बसले. काही वेळाने तिथे एक महारोगी आला आणि जनुबुवांना म्हणाला, ‘मला, ‘सोलापूरच्या शुभराय मठात जा आणि श्रीशंकर महाराजांचे दर्शन घे’ असा देवीचा दृष्टांत झाला म्हणून मी येथे आलो.’ श्रीमहाराजांनी त्याचे बोलणे ऐकले आणि ते जनुबुवांस म्हणाले, ‘ती खोली उघडा आणि याला आत पाठवून तेथील मळ त्याच्या सर्वांगास चोळण्यास सांगा.’ श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार जनुबुवांनी त्या रोग्याला बंद खोली उघडून आत जाण्यास सांगितले. रोग्याने आत जाऊन पाहिले तेव्हा श्रीमहाराजांनी तिथे टाकलेल्या मळाला अपार सुगंध येत होता. रोग्याने त्यातील काही भाग आपल्या शरीराला चोळूनचोळून लावताच त्याच्या रोगग्रस्त कातडीच्या खपल्या पडू लागल्या आणि काही दिवसांतच त्याची काया पूर्ववत दिसू लागली.

श्रीशंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न त्याकाळी अनेकांनी केला मात्र श्रीमहाराजांनी तसे होऊ दिले नाही. त्यांच्या परवानगीशिवाय चरित्र लिहिण्याचे धाडस एका भक्ताने केले तेव्हा श्रीमहाराजांनी ते चरित्र रागाने माळ्यावर फेकून दिले. पुढे कर्नाटकातील हिप्परगी येथील भागवत नावाच्या भक्ताने श्रीमहाराजांचे चरित्र लिहिले तेव्हा त्या चरित्राची पाने श्रीमहाराजांनी सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद देण्यासाठी वापरली. हे पाहून भागवत नाराज झाले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘जेव्हा दासबोध, ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहून काढा.’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या