
खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून वडापाव व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती. यावेळी त्यांच्या खिशात त्रास देणाऱया 15 खासगी सावकारांची नावे आणि रक्कम लिहिलेली चिठ्ठी आढळली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ खासगी सावकारांना अटक केली असून, सहा सावकार अद्यापि फरार आहेत.
शिवराम रमेश वहाडणे (वय 42) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, वंदना शिवराम वहाडणे (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. जयसिंग मस्के, शहाजी झुंजरूक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण, अक्षय कैके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रवीण जाधव व धीरज भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर मुन्ना काळे, आकाश भोसले, राहुल खामकर, विनोद घोडके, शिंदे सरपंच, राजू बोरुडे हे फरार आहेत.
श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध माउली वडापावचे मालक शिवराम वहाडणे यांनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्रास दिलेल्या तब्बल 15 खासगी सावकारांची नावे चिठ्ठीत लिहून व्याज व मुद्दल देऊनही वारंवार दुकान व घरी येऊन धमक्या व दमदाटी करीत असल्याचे नमूद केले होते.
या चिठ्ठीत प्रवीण जाधव 40 हजार रुपये 10 टक्के व्याजाने, कांतीलाल कोकाटे 2 लाख रुपये 5 टक्के व्याजाने, अक्षय कैके 20 हजार रुपये 20 टक्के व्याजाने, बापू चव्हाण 50 हजार रुपये 40 टक्के व्याजाने, राहुल धोत्रे 50 हजार रुपये 10 टक्के व्याजाने, भास्कर उर्फ आप्पा सांगळे 25 हजार 40 टक्के व्याजाने, जयसिंग मस्के अडीच लाख 4 टक्के व्याजाने, शहाजी उर्फ आबा झुंजरूक 20 हजार रुपये 40 टक्के व्याजाने, धीरज भोसले 1 लाख 20 हजार रुपये 20 टक्के व्याजाने, मुन्ना काळे 1, लाख 20 टक्के व्याजाने, आकाश भोसले 1 लाख 30 हजार रुपये 20 टक्के व्याजाने, राहुल खामकर 30 हजार रुपये 5 टक्के व्याजाने, विनोद घोडके 20 हजार रुपये 40 टक्के व्याजाने, शिंदे सरपंच 20 हजार रुपये 40 टक्के व्याजाने व राजू बोरुडे 40 हजार रुपये 40 टक्के व्याजाने असे सर्वांचे मिळून 11 लाख 15 हजार रुपये प्रतिमहिना 5 टक्के ते 40 टक्के व्याजदराने पैसे घेतले होते. वहाडणे यांनी या सावकारांची व्याजासह मुद्दल देऊनही हे सावकार दुकानात, घरी येऊन वारंवार पैशांची मागणी करीत धमक्या देत होते. याला कंटाळून वहाडणे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी सावकारांची धरपकड सुरू केली. यातील नऊजणांना अटक केली असून, सहाजण फरार झाले आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले तपास करीत आहेत.



























































