
राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रकार उघडकीस येत असतानाच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील काष्टी येथे ‘आमच्या धर्मात या, तुमच्या मुलाचे लग्न होईल,’ असे सांगत कपाळावर तेल लावून ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी दबाव टाकणाऱया तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नम्रता वेंकटेश वारनसे (वय 27, रा. पानसरेवस्ती, ता. दौंड), शारदा आकाश सौंदडे (वय 27), वैशाली सुनील पवार (वय 36, दोघेही रा. विध्नेवस्ती, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत नागरिकांसह तक्रारदार मयूर मदरे यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकाश मदरे (रा. झोपडपट्टी, काष्टी ता. श्रीगोंदा) हा तरुण आई आणि भावासह काष्टी येथे राहतो. शनिवारी सकाळी त्याच्या घरी तीन महिला आल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबत त्यांच्या कुटुंबास माहिती दिली. त्यानंतर ‘तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश करा, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या मुलाचे लग्न होईल,’ असे सांगून प्रकाश आणि त्याच्या आईच्या कपाळाला तेल लावले आणि येशूची प्रार्थना केली. त्यानंतर त्या महिलांनी मदरे यांच्यावर दबाव टाकू लागल्या. मात्र, ‘आम्ही इतर धर्मामध्ये जाण्यास तयार नाही,’ असे प्रकाश याने सांगताच त्या महिलांनी शिव्या-शाप देण्यास सुरुवात केली. अखेर हा प्रकार मदरे याने प्रतीक पाचपुते यांना सांगितला. पाचपुते यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
– पोलिसांनी त्या तीन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. या महिलांच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे का? त्यांनी अजून कोणावर अशाच प्रकारे दबाव टाकला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.


























































