खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस, आधी विधान करत मग शिरसाट यांचे घुमजाव

श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आली होती अशी माहिती मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. नंतर शिरसाट यांनी घुमजाव करत श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली नाही असे विधान केले. त्यात आजच एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. संजय शिरसाट यांनी आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली होती. त्यावर विधीमंडळ परिसरात शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तेव्हा शिरसाट म्हणाले की आयकर विभाग प्रत्येकाची तपासणी करत असतो. मला आयकर विभागाची नोटीस आली, श्रीकांत शिंदेंना पण नोटीस आली असे अनावधानाने आधी शिरसाट म्हणून गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधीमंडळात आले. त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांना पुन्हा प्रतिक्रिया दिली. तेव्हा फक्त आपल्याला नोटीस आल्याचे सांगितले. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली का असे विचारले असता शिरसाट यांनी माहित नाही असे सांगितले. तसेच श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचे वाक्य आपल्या तोंडी घातल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी

आज एकनाथ शिंदे गुपचूप दिल्लीला जाऊन आले होते. त्यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या मंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. श्रीकांत शिंदेंना आयकराची नोटीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.