
सामना ऑनलाईन। श्रीनगर
पाकिस्तान पुन्हा एकदा घुसखोरीच्या तयारीत असून दहशतवाद्यांना हिंदुस्थानात पाठवण्यासाठी पाकड्यांनी सीमेजवळ डबल डेकर बंकर उभारण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय बंकर उभारण्यात पाकिस्तानी सैनिकांना मदत करत असल्याचे समोर आले आहे.
एका हिंदी वृत्तवाहीनीने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार पाकड्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी अनेकवेळा उधळवून लावल्याने पाकडे चवताळले आहेत. यामुळे सीमेवरच घुसखोरांना लपता यावे व त्यांना कव्हर फायरिंग देण्यासाठीच बंकर्स उभारण्याचा घाट पाकड्यांनी घातला आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुखमल येथे पाकड्यांनी तीन डझनहून अधिक डबल डेकर बंकर्स बांधले आहेत. हे बंकर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर आहेत. दरम्यान बीएसएफचे जवान पाकिस्तानी सैनिकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. याबद्दल बीएसएफने नुकताच एक अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. ज्यात पाकिस्तान किती वेगाने व कशा प्रकारे सीमेवर सिमेंटचे बंकर्स उभारत आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे बंकर्स बीएसएफच्या गोळीबारापासून दहशतवाद्यांचा बचाव व्हावा याबरोबरच त्यांना लपता यावे यासाठी उभारण्यात येत असल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.


























































