मोदी आणि रॉय यांच्यामुळेच कश्मीरी तरुण पाकिस्तानच्या वाटेवर – मुफ्तींचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेघालयचे राज्यपाल रॉय यांच्या आडमुठेपणामुळे कश्मीरी तरुण पाकिस्तानच्या वाटेवर जाऊ शकतात. असे खळबळजनक विधान पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

नोकरी व शिक्षणानिमित्त इतर राज्यात राहणाऱ्या कश्मीरी विद्यार्थी आणि व्यापारांना संशयाने बघितले जात आहेत. या तरुणांचे संबंधही दहशतवाद्यांशी जोडण्यात येत आहेत. यावर पंतप्रधान काहीच बोलत नसल्याने आपण नाराज झालल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले आहे. त्यांनी कश्मिरींवर बहिष्कार घालण्याचे विधान करणाऱ्या मेघालयाच्या राज्यपाल रॉय यांना तात्काळ पदावरून हटवण्याचीही मागणी केली.

तसेच पुलवामामध्ये जे काही झाले ते खेदजनक आहे. या दहशतवादी हल्ल्याला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. पण या हल्ल्यानंतर कश्मीरी नागरिकांबरोबर जे काही होत आहे त्याबद्दल मुफ्ती यांनी खेद व्यक्त केला आहे.  त्यांच काय चुकलयं? ते निरपराध आहेत, ते शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात जातात. तिथे त्यांच्याबरोबर जी मारहाण केली जात आहे त्याच्याबाबत पंतप्रधान कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याबद्दल मुफ्ती संतापल्या आहेत. कश्मीरी विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांवर जो अन्याय केला जात आहे त्यामुळे कश्मीरी एकटे पडले असून ते पाकिस्तानची वाट धरू शकतात असा इशारा मुफ्ती यांनी दिला आहे.

मेघालयाच्या राज्यपालांना तडकाफडकी पदावरून हटवणे गरजेचे आहे असेही मुफ्ती यांनी यावेळी म्हटले. सरकारजवळ कश्मीरची जमीन आहे. पण लोकांचे मन जिंकणं जास्त गरजेचं आहे. मात्र जर अशीच परिस्थिती राहीली तर कश्मीरी तरूण पाकिस्तानात जाण्यास वेळ लागणार नाही असं मुफ्तींचं म्हणणं आहे.

रॉय यांनी 19 फेब्रुवारीला एका माजी सैनिकाच्या विधानाचे समर्थन केले होते. ज्यात त्याने पुलवामा हल्ल्याचा वचपा काढायचा असेल तर प्रत्येक कश्मीरी वस्तूंपासून तेथील पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यावर मुफ्ती यांनी नाराजी व्यक्त केली होती.