
श्रीरामपूर एमआयडीसीत प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी शाई बनविणाऱया ‘सरफेस कोटिंग’ या कंपनीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून, कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये कृष्णा यादव यांची प्लॉट नं. सी-89 मध्ये ‘सरफेस कोटिंग’ नावाने प्रिंटिंगसाठी लागणारी शाई बनविणारी कंपनी आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रोजच्याप्रमाणे काम सुरू असताना अचानकपणे आग लागली. यावेळी यादव व कंपनीतील तीन ते चार कर्मचाऱयांनी आग विरोधक नळकांडेही फोडले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी बाहेरच्या दिशेने पळ काढला. यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. मोठमोठे स्फोट होत होते. आग विझवण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका, अशोक कारखाना, गणेश कारखाना, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले होते, तसेच साई संस्थांचा फोमचा बंबही घटनास्थळी दाखल झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, तहसीलदार प्रशांत पाटील, आमदार लहू कानडे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, एमआयडीसीतील उद्योजक बाबासाहेब काळे यांच्यासह अन्य उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महावितरणच्या कर्मचाऱयांनी तातडीने परिसरातील वीज बंद केली. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.






























































