व्यापारी गौतम हिरण हत्येप्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली आहे. या गुह्यात दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या दोघांवर अनेक गुन्हे दाखल असून, या गुह्यात आणखी आरोपी निष्पन्न होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हिरण यांच्या डोक्यात जोरात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

सागर गंगावणे व बिट्टू रावजी वायकर (रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गौतम हिरण हे 1 मार्चपासून बेलापुरातून बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद भाऊ पंकज हिरण यांनी दिली होती. अखेर सात दिवसांनंतर वाकडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत हिरण यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी 40 जणांची चौकशी केली असून, दोघांना अटक केली आहे. दरम्यान, हिरण यांच्या हत्येचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.