टिपरे कुटुंब पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

केदार शिंदे यांची ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. यातील आबा, शेखर, शलाका, शिऱ्या ही पात्रं सगळ्यांना आपल्या घरातीलच एक भाग असल्यासारखी वाटली. लॉकडाऊन दरम्यान या मालिकेचे जुने भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे केदार शिंदे आता या मालिकेचा पार्ट टू आणण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात टिपरे कुटुंबाचे एक कॅरिकेचर शेयर करत ते म्हणाले, ‘लोकहो लवकरच नवं काहीतरी घेऊन येतोय…यासारखं काहीच असू शकत नाही. पण, अभिमानाने सांगू शकाल की, मराठीत चांगलं पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.’ त्यांच्या या पोस्टने मालिकेबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, विकास कदम, शुभांगी गोखले आणि रेश्मा नाईक यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. नव्या मालिकेत कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या