नृत्य…चित्रपट…नाट्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुभंकर तावडे. नृत्यातून चित्रपट, नाटक… अशा ताज्या दमाचा प्रवास त्याने सुरू केलाय. सुनील तावडेंचा मुलगा ही ओळख तो अभिमानाने मिरवतोय.

रंगभूमीवर  नव्यानेच दाखल होत असलेल्या ‘नटसम्राट’ नाटकात राजा या बुटपॉलीश करणाऱ्या युवकाची व्यक्तिरेखा शुभंकर तावडे करतोय. रूईया महाविद्यालयात असताना त्याने 2 वर्षे एकांकिका गाजवल्या. त्याला अनेक बक्षिसेही मिळाली. पण त्यातूनच त्याला अभिनयाचा नाद लागला. कॉलेज संपल्यावर त्याने मुंबईच्याच ड्रामा स्कूलमधून एक वर्षाचा थिएटर कोर्स पूर्ण केला. मग त्याला झी युवा वाहिनीवरची ‘फ्रेशर्स’ ही मालिका मिळाल्याचं तो सांगतो. शुभंकर हा मुळात नर्तक… ऋषिकेश जोशींच्या ‘गर्वनिर्वाण’ या नाटकात त्याने भन्नाट तांडव नृत्य केलं होतं. पण त्याच्यात असलेली अभिनय क्षमता दिग्दर्शक ऋषिकेश जोशींच्या नजरेतून सुटली नव्हती. म्हणूनच तर नव्या ‘नटसम्राट’ची आखणी करताना त्यांनी राजाची भूमिका शुभंकरलाच दिली. मालिका, सिनेमा आणि नाटक या तीनही माध्यमांत तो सहज वावरतो. ‘डबल सीट’ सिनेमात त्याने अंकुश चौधरीच्या भावाची भूमिका केली होती.

आपल्या वडिलांना… सुनील तावडे यांना तो खूप मानतो. तेच त्याचा आदर्श आहेत. तो म्हणतो, माझ्या जन्मापासूनच बाबांनी मला दिशाच दाखवली. काय करायचं ते वेळोवेळी सांगितलं. एखादी गोष्ट करू नको असा त्यांचा कधीच आग्रह नसतो. कसं चालायचं हे त्यांनी दाखवलं, पण मी चालायला लागल्यावर कधी आडकाठी केली नाही. मला माझ्या मताप्रमाणे चालण्याची मोकळीक त्यांनी दिली. त्यांच्या अभिनयापर्यंत पोहोचण्याचीच माझी महत्त्काकांक्षा आहे. मी जास्त यशस्वी झालो तरी त्याचा आनंद त्यांनाच जास्त होणार आहे याची मला कल्पना आहे, असंही तो स्पष्ट करतो. गंमत म्हणजे सतीश दुभाषी नटसम्राट साकारायचे त्या नाटकात राजाची भूमिका सुनील तावडेच करायचे… शुभंकरनेच हे सांगितले. तो म्हणतो, ‘नटसम्राट’ हे नाटक आमच्या घरात सर्वांनाच जवळचे होते ते बाबांमुळेच… घरात ते या नाटकातील संवाद सतत म्हणायचे. मलासुद्धा ते तोंडपाठ आहेत. आता रिहर्सलला जातो तेव्हा तेच संवाद ऐकतो तेव्हा मजा वाटते. बाबांनी केलेली भूमिका करायला मिळण्यासारखं भाग्य फार लोकांना मिळत नाही, असंही तो म्हणाला.