लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?

हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असून तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. लॉर्ड्सवर इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांमध्ये गुंडाळवर हिंदुस्थाननेही पहिल्या डावात 387 धावाच केल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना हिंदुस्थानचा डाव आटोपला. यानंतर इंग्लंडला फलंदाजीला उतरावे लागले. यानंतर किमान दोन षटकांचा खेळ होऊ शकला नसता. पण इंग्लंडच्या खेळाडूंनी नाटकं सुरू केली आणि जसप्रीत बुमराहचे एकच षटक पूर्ण झाले. यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला.

हिंदुस्थानचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. डावखुरा फलंदाज बेन डकेट आणि जॅक क्रॉली ही जोडी सलामीला आली. दुसरीकडे शुभमन गिलने चेंडू जसप्रीत बुमराकडे सोपवला. दिवस संपण्यास सहा ते सात मिनिटांचा कालावधी बाकी असल्याने दोन षटकांचा खेळ होऊ शकला असता. पण जास्त षटके होऊ नये म्हणून इंग्लंडने रडीचा डाव सुरू केला.

हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह हा गोलंदाजी करत होता. आणखी एक षटक टाकायला मिळेल म्हणून झटपट षटक पूर्ण करण्याचा बुमराहचा प्रयत्न होता. बुमराहचे पहिले दोन चेंडू जॅक क्रॉलीने व्यवस्थित खेळून काढले. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या आणि पुन्हा स्ट्राईकवर आला.

बुमराह तिसरा चेंडू टाकण्यासाठी येत असताना जॅक क्रॉली याने त्याला रोखले. साइट स्क्रीनच्या बाजुला काहीतरी अडचण असल्याची खुण त्याने केली. यामुळे स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार शुभमन गिल चांगलाच संतापला. गिल रागारागाने पुढे आला आणि हातवारे करत त्याने क्रॉलीला काहीतरी सुनावले. हिंमत असेल तर चेंडू जरा खेळून काढा… असे म्हणत गिलने क्रॉलीला चांगलेच फटकारले.

जॅक क्रॉली मुद्दाम वेळ वाया घालवत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर बुमराहच्या षटकातील पाचवा चेंडू क्रॉलीच्या ग्लोवजला लागला. त्यामुळे त्याने फिजिओला बोलावले. यामुळे गिलसह संपूर्ण हिंदुस्थानी खेळाडूंनी त्याच्या नाटकासाठी टाळ्या वाजवल्या. नंतर गिलने जवळ जात इम्पॅक्ट प्लेअरला बोलवा अशी खुणही केली. यावेळी दोघांमध्ये थोडी बाचाबाचीही झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही चांगलाच भडकला. त्यानेही टाळ्या वाजवत क्रॉलीला खिचवले. अखेर फिजिओ उपचार करून गेल्यानंतर बुमराहचा चेंडू त्याने खेळून काढला. हा चेंडू त्याच्या बॅटच्या जवळून गेला आणि क्रॉली थोडक्यात वाचला.