लॉकडाऊन काळात केली जनतेची सेवा! सेलिंगपटू श्वेता शेरवेगारचे भावुक उद्गार

525

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात क्रीडाविश्व ठप्प होते. यावेळी इतर खेळाडू फिटनेस व कुटुंबासोबत वेळ घालवत होते. यावेळी हिंदुस्थानच्या एका क्रीडापटूने मात्र जनतेसाठी वाहून घेतले होते. सेलिंग या समुद्री क्रीडाप्रकारात देशाचे नाव उज्ज्वल करणारी श्वेता शेरवेगार हे तिचे नाव. सकाळ, संध्याकाळ कम्युनिटी सेंटरच्या सहाय्याने ती मुंबईकर जनतेच्या आरोग्याची काळजी घेत होती. या कालावधीत ती फक्त कोरोना पेशंटचाच नव्हे तर सर्वसाधारण पेशंटचाही इलाज करीत होती. कारण प्रत्येक विभागातील दवाखाने या काळात बंद होते. शिवसेनेच्या मदतीने ती आपले कार्य इमानेइतबारे करीत होती. याप्रसंगी दैनिक `सामना’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर दृष्टीक्षेपही टाकला.

ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून द्यायचेय

सेलिंग या खेळाच्या प्रत्यक्षात सरावाला किंवा स्पर्धेला चार ते पाच महिने अजून लागतील. सध्या आर्मी व नेव्हीतील सेलर्सला सरावाची परवानगी देण्यात आली आहे. इतरांना सेलिंगचा सराव अद्याप करता येणार नाही. आगामी ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. जेणेकरून टोकियो ऑलिाम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करता येईल. तसेच यामध्ये पदक जिंकून तिरंगा रूबाबात फडकवता येईल, असे सांगताना श्वेता शेरवेगार भावुक झाली.

घरीच फिटनेसचा सराव

हिंदुस्थानात मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. तिथपासून घरीच फिटनेससाठी सर्वस्व पणाला लावत आहे. जिम बंद असल्यामुळे कोणत्याही साधनांशिवाय फिटनेसकडे लक्ष देत होती. यामध्ये डाएट, मेण्टल ट्रेनिंग, कार्डिओ आदी बाबींचा समावेश होता, असे श्वेता शेरवेगार यावेळी म्हणाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई

दहाव्या वर्षीच सेलिंगमध्ये श्रीगणेशा झाला. 2007 सालामध्ये पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत लेझर बोटच्या सहाय्याने गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर आशियाई गेम्समध्ये रौप्य, आशियाई सेलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि चीनमधील तीन इव्हेण्टमध्ये अनुक्रमे रौप्य, चौथा क्रमांक व महिला विभागात पहिला क्रमांक पटकावला, असे सांगणाऱ्या श्वेता शेरवेगार हिच्या देहबोलीतून आत्मविश्वास झळकत होता.

क्रीडामधील करिअरमुळे डॉक्टरी करता आलेली नाही

वायएमपी कॉलेजमधून मी मेडीकलचे शिक्षण पूर्ण केले. पण सेलिंग या क्रीडा प्रकारात करिअर केल्यामुळे मला डॉक्टरीकडे लक्ष देता आले नाही. माझा भाऊही आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत आहे. मी माझगाव, ताडवाडीत कुटुंबासोबत वास्तव्य करते, असे श्वेता शेरवेगार पुढे म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या