थिएटरमध्ये घाबरवणारे श्याम रामसे गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अनेक हॉरर सिनेमांची निर्मिती करून थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारे निर्माते-दिग्दर्शक श्याम रामसे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात साशा आणि नम्रता या दोन मुली आहेत. श्याम यांच्या निधनाने बॉलीवूड विश्वावर शोककळा पसरली आहे.

भयपटांच्या निर्मितीत रामसे बंधूंचा हातखंडा होता. श्याम रामसे हे सात रामसे भावंडांपैकी एक होते. कमी बजेटमध्ये त्यांनी उत्तमोत्तम भयपटांची निर्मिती केली होती. यात ‘दो गज जमीन के नीचे’, ‘पुरानी हवेली’, ‘तहखाना’, ‘घुंगरू की आवाज’ या चित्रपटांचा समावेश होता. श्याम रामसे यांनी ‘अंधेरा’, ‘सबूत’, ‘पुराना मंदिर’, ‘बंद दरवाजा’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शनदेखील केले होते. छोटय़ा पडद्यावर त्यांनी आणलेल्या ‘झी हॉरर शो’लादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. श्याम रामसे काही दिवसांपासून न्यूमोनियामुळे त्रस्त होते. उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच वर्षी डिसेंबरला त्यांचे बंधू तुलसी रामसे यांचे निधन झाले होते.