
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून एका भावाबहिणीच्या जोडीने नकली कंपनी थाटून 1500 जणांना चुना लावला आहे. निखिल आणि प्रियंका अशी या भाऊ-बहिणीची नावं आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडला आहे. येथील एका नकली प्लेसमेंट एजन्सीवर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा तिथे 20 मोबाईल, 225 रिझ्युम्स, 10 ट्रेनिंग लेटर आणि अन्य काही सामान आढळलं. ही एजन्सी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत होती. 2017पासून सुरू असलेल्या या एजन्सीचा पोलिसांना पत्ताच नव्हता.
या एजन्सीचे प्रमुख निखिल आणि प्रियंका हे दोघेही सख्खे भाऊ-बहिण असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या दोघांनी गेल्या तीन ते चार वर्षांत 1500 जणांना चुना लावल्याचंही तपासात उघड झालं आहे. निखिल आणि प्रियंका हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. प्रियंका ही कायद्याची पदवीधर आहे तर निखिल एमबीए झाला आहे. त्यामुळे या दोघांनी असं का केलं असावं असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
त्यांनी दोघांचीही कसून चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आलं. उच्चशिक्षित असूनही निखिलला नोकरी शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने एक प्लेसमेंट एजन्सीकडे नोकरी करायला सुरुवात केली. तिथे थोड्या पैशांच्या मोबदल्यात लोकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यात येत असत. या एजन्सीत ज्यांना नोकरी मिळत नसे, त्यांचे पैसे परत दिले जात नसत. त्यावरून निखिलला एक कल्पना सुचली.
निखिल त्या एजन्सीतून बाहेर पडला आणि बहिणीसोबत 2017मध्ये स्वतःची प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. त्यातून ते लोकांना नोकऱ्या द्यायचं आमीष दाखवायचे. या नोकऱ्या देखील एअरलाईन्स कंपनी, प्रसिद्ध बँक किंवा रुग्णालय यातील असत. त्यासाठी 3 हजार रुपये प्रवेश फी घेतली जात असे. त्यानंतर खोट्या खोट्या ट्रेनिंगच्या बहाण्याने 6 हजार रुपये त्यांच्याकडून उकळले जात होते.
एका माणसाकडून जास्तीत जास्त दहाच हजार रुपये उकळले जात. कारण, तेवढ्या पैशांसाठी कुणीही तक्रार करण्याच्या किंवा कोर्टात जाण्याच्या भानगडीत पडत नाही, असं निखिल याला आढळून आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही संशय न येता ही कंपनी तीन वर्षं सुरू होती. या कामासाठी या जोडगोळीने कार्यालय घेऊन तिथे छोटेखानी कॉलसेंटरही सुरू केलं होतं.





























































