Sorry भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! उद्विग्न होत सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरणाने देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या घटनेविरोधात आंदोलनं होत आहेत. देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. एकीकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दुसरीकडे कोलकाता बलात्कार प्रकरणात दररोज वेगवेगळे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यावरून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमधून देशातील जनतेला एक आवाहन केले आहे. ‘मुलगी सातच्या आत घरात येते की नाही ते बघण्यापेक्षा मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो? काय करतो? त्याची संगत? त्याचे काय विचार आहेत हे बघा’, असे त्याने लोकांना आवाहन केले आहे.

“मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे आता आपण बोलायला नको… मुलगी शिकतेय, पण तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय… पण, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातील मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातील मुलगा संध्याकाळी सातच्या नंतर कुठे जाते? काय करतो? कोणाशी संगत आहे त्याची? तो कोणाशी बोलतो? काय विचार आहेत? हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातील मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला. तर या देशाची प्रगती झाली. या देशातील मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आईवडिलांचे त्याच्या मित्राचे, नातेवाईकांचे विचार बदलले… तरंच ही भारतमाता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. नाहीतर स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनंतर सुद्धा ती दहशतीतच जगतेय… विचार करूया…”, असंही त्याने पुढे म्हटलं आहे. “Sorry भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! हा Independence Day तुझ्यासाठी Happy नाही. क्षमा”, असं म्हणत सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर केला आहे.