सिद्धार्थ बनला गायक

रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱया सिद्धार्थ जाधवचं एक नवं रूप प्रेक्षकांना ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धार्थने अनेक कलाकारांसोबत मंचावर धिंगाणा घातलाय. भन्नाट टास्क आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमाला महाराष्ट्राचा नंबर वन कार्यक्रम बनवला. 31 डिसेंबरच्या विशेष भागात सिद्धार्थ गायकाच्या रूपात प्रेक्षकांना नव्या वर्षाची अनोखी भेट देणार आहे.

 नव्या प्रयोगाविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, माझ्यासाठी हे वर्ष खऱया अर्थाने धिंगाणामय झालंय. या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी विशेष भागात मी आनंद शिंदेंचं एक सुपरहिट गाणं सादर करणार आहे. माझ्यासाठी हा अतिशय भन्नाट अनुभव होता. गाण्याची आवड मला आहेच. या विशेष भागाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. माझ्यासोबत सुनील बर्वे, मधुराणी गोखले प्रभुलकर, शशांक केतकर, आशा शेलार, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या गाण्यांची मेजवानी प्रेक्षकांना मिळेल.