
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल अॅपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या अॅपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोईसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे अॅप अँड्राईड आणि अॅपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येईल. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशिर्कचन करतील. तसेच अॅपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्यायावत माहितीही उपलब्ध होईल. या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ऍड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदि उपस्थित होते.


























































