
सामना प्रतिनिधी । पणजी
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांना बाजूला ठेऊन माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पणजीचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रदेश भाजपने पणजी मनपा मधील भाजप नगरसेवक, पणजी भाजप मंडळ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर राज्य निवडणूक समितीने सिद्धार्थ आणि उत्पल यांची नावे केंद्रीय समितीला कळवली होती.
BJP releases list of candidates for bye-elections to 2 legislative assembly constituencies of Karnataka & 1 of Goa; Sidharth Kuncalienker to contest from Panaji, Avinash Yadav from Chincholi & SI Chikkanagowdar from Kundgol pic.twitter.com/6sIIpAltYL
— ANI (@ANI) April 28, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथील कार्यक्रमांमध्ये केंद्रीय नेते व्यस्त असल्याने पणजीच्या उमेदवाराची निवड लांबली होती. अखेर रविवारी दुपारी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उमेदवारी जाहीर होताच कुंकळ्येकर यांनी पणजी मधील राजकीय नेत्यांशी संवाद साधून पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली आहे.
गोव्यासह भाजपने कर्नाटकातील दोन जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. चिचोळी येथून अविनाश जाधव आणि कुंडगोल येथून एसआई चिक्कनगौदर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


























































