
मध्य रेल्वेच्या वाशिंद-आसनगाव स्थानकांदरम्यान आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे कल्याण-कसारा डाऊन मार्गावरील लोकल सेवा अडीच तास विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे चाकरमान्यांसह लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या कर्मचाऱयांनी शर्तीचे प्रयत्न करून दुरुस्ती केल्यानंतर रात्री नऊ वाजता लोकल सेवा सुरळीत सुरू झाली. वासिंद आणि आसनगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी लोकलसह मुंबई-मनमाड पंचवटी एक्प्रेस, मुंबई-नागपूर विदर्भ एक्प्रेससह अन्य लांब पल्ल्याच्या गाडय़ा वासिंद व खडवली स्थानकांदरम्यान प्रत्येक लोकलला अर्धा तास थांबा दिला. या बिघाडामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून कसारा-आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांची लटपंती झाली.






























































