
पश्चिम रेल्वेचा मार्ग मध्य रेल्वेपेक्षा सरळसोट असला आणि त्यांची वाहतूक तुलनेने कमी असली तरी सिग्नल बिघाडांच्या बाबतीत पश्चिम रेल्वेही कमी नसल्याची आकडेवारी बाहेर आली आहे. गेल्या तीन वर्षांत पश्चिम रेल्वेवर एकूण 4,504 सिग्नल बिघाड घडले असून गेल्या आर्थिक वर्षांत (2017-18) दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पश्चिम रेल्वेकडे जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2019 दरम्यान पश्चिम रेल्वेवर किती सिग्नल बिघाड आणि इंजिन बिघाड (डिझेल आणि इलेक्ट्रिक) तसेच ट्रक फॅक्चर झाले याची माहिती मागितली होती. 1 जानेवारी 2016 पासूनची माहिती रेल्वेने झवेरी यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर 2016-17 या आर्थिक वर्षात तब्बल 1541 सिग्नल बिघाड घडल्याने ट्रेनची वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना फटका बसल्याचे झवेरी यांनी म्हटले आहे. तर 2017-2018 या आर्थिक वर्षात 1063 सिग्नल बिघाड झाल्याचे उघडकीस आले आहे. तर 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 592 सिग्नल बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. सिग्नल बिघाडांचा आलेख पाहता 2018-19 या आर्थिक वर्षात 1063 सिग्नल बिघाड घडल्याने दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड घडल्याने ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले. 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या नऊ महिन्यांतच 592 सिग्नल फेल झाले असल्याचे उघडकीस आले आहे.
811 इंजिनांत बिघाड
साल 2016-17 या आर्थिक वर्षात ‘परे’वर एकूण 512 इंजिने बिघडल्याचे उघड झाले असून 2017-18 या आर्थिक वर्षात 811 इंजिनांमध्ये बिघाड झाल्याने मेल-एक्प्रेसच्या प्रवाशांना फटका बसल्याचे उघड झाले आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 44 ट्रक फॅक्चर झाले तर 2017-18 आर्थिक वर्षात 21 ट्रक फेल झाल्याचे उघडकीस आले आहे.

























































