
शहर परिसरातील मुसळधार पावसामुळे सीना नदीला रात्री पूर आला. मात्र, नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी मोठय़ा प्रमाणात सोडले जात असल्याने शहराबाहेर शिरढोण शिवारात नदीपात्रात फेसाचे डोंगर पाहावयास मिळाले. यामुळे शहरातून वाहणारी सीना नदी किती प्रदूषित आहे, हे यावरून उघडकीस आले आहे. मात्र, प्रदूषण महामंडळ याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
नगर शहरातून वाहणारी नदी एमआयडीसीच्या जवळून वाहते. एमआयडीसी परिसरातील छोटय़ा-मोठय़ा ओढय़ा-नाल्यात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने हे पाणी सीना नदीला येऊन मिळाल्यानंतर पुढे हे पाणी कर्जत, जामखेड तालुक्यात नदीद्वारे वाहत जाते. शिवसेनेचे जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी नदी प्रदूषणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून याकडे लक्ष वेधले होते. मात्र, याकडे प्रदूषण महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. आता काल झालेल्या पावसामुळे सीना नदीपात्रातील प्रदूषण पुन्हा एकदा समोर आले आहे.
केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा
नगर शहरातून वाहणाऱया सीना नदीवर पुढे कर्जत तालुक्यात मोठे धरण असून, या धरणाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी तसेच शेतीसाठी पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र, जर केमिकलयुक्त पाणी शेताला दिल्यास भविष्यात शेतकऱयांची जमीन खराब होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या केमिकलयुक्त पाण्याचा शोध लावून नदीत पाणी सोडणाऱयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.






















































