
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथील टोल नाका उद्या, 14 जूनपासून सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला आहे. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. ओसरगाव टोल नाक्यावर 14 जूनपासून टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात 50 टक्के सवलत असणार आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांना महिन्यासाठी 330 रुपयांचा पास असणार आहे.
टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे, अशी भूमिका टोलविरोधी कृती समितीची आहे. उद्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली टोलनाक्याला विरोध करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलिसांची पाळत
गोकुळ दूध संघाची बोर्ड मीटिंग आटोपून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव वैयक्तिक कामाकरिता फुलेवाडीकडे जात होते तेव्हा त्यांना रोखण्यात आले. ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे जात असल्याच्या संशयावरून हॉटेल इंदिरा सागर, संभाजीनगर येथे त्यांची गाडी पोलिसांनी अर्धा तास अडवली. त्यानंतर जाधव यांच्या हालचालींवर पोलीस व्हॅनमधून पाळत ठेवण्यात आली.

























































