शिरोडा वेळागरच्या किनाऱ्यावर पंचतारांकित पर्यटन केंद्र, ताज ग्रूपची 100 कोटींची गुंतवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळागरच्या नितांतसुंदर समुद्रकिनाऱ्यावर पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व हॉटेल ताजमध्ये गुरुवारी सामंजस्य करार झाला. कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्प निर्माण होत आहे. ताज ग्रुप या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासोबत पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा वेळागरमधील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताजमध्ये सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हिंग हॉटेल्स प्रा. लिमिटेडमध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

90 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने

सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी 54.40 हेक्टर जमीन 90 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येईल. त्यासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व इंडियन हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

राज्याचे वैभव

ताडोबातील वाघ, राज्यातील समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. ते जगासमोर नेले पाहिजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देईल. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देणे ही अभिनव कल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यटन बंद असले तरी कोरोनाचे संकट संपल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ताज हॉटेलने कोकणात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पर्यटनाला चालना

पुढील सहा महिन्यांत राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा अधिकाधिक राहील यासाठी प्रयत्न करू. पर्यटन विभागामार्फत यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत असून कोरोना संकटानंतर राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने आखणी करण्यात येत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न आहे. एमटीडीसी आणि ताज हॉटेलच्या समन्वयातून कोकणात साकारत असलेल्या पर्यटन प्रकल्पातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.