
सामना प्रतिनिधी। मालवण
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची साक्ष देत साडेतीनशे वर्ष सागरी लाटांचा सामना करत मालवण समुद्रात मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीला झाडांनी वेढले आहे. वाढणाऱ्या झाडांची मुळे तट-बुरुज पोखरत असून किल्ल्याची तटबंदी धोक्यात आली आहे.
दरम्यान तटबंदीत वाढणाऱ्या या झाडीकडे पुरातत्व विभाग व किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटकांकडून कर आकारणी करणाऱ्या वायरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. याबाबत पर्यटक व किल्ले प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देतात. गत वर्षी चार लाख पर्यटक संख्येच्या आकडेवारीची नोंद बंदर विभागाकडे आहे. मात्र किल्ल्यात व तटबंदीवर वाढलेली झाडी. पर्यटकांना पहावी लागते. सतत वाढणारी झाडाची पाळें-मुळे तट-बुरुजाचे बांधकाम कमकुवत करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची पुरातन तटभिंतींची ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’ दिवसेंदिवस धोक्यात येत आहे.
किल्ले सिंधुदुर्ग वायरी ग्रामपंचायत हद्दीत येतो. शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत किल्ले सिंधुदुर्गवर प्रती व्यक्ती पाच रुपये कर आकारते. या कर रक्कमेतून सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तर किल्ल्याची देखभाल दुरुस्ती पुरातत्व विभागाकडे येते. तो विभागही सोयीस्कर दुर्लक्ष करतो असे चित्र आहे. अशा स्थितीत महाज्यांचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग व वायरी ग्रामपंचायत पुढाकार घेणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
तटबंदी दुभंगण्याची भीती
झाडांची मुळे तटाला भेगा पाडतात. मुळे भिंतीत खोलवर गेल्याने तटभिंतीचे दगड दुभंगले जात आहेत. दक्षिण-पश्चिम अशा तटभिंतीचा शिवकालीन चुना निघून गेला आहे. तटभिंतीचे दगड मोकळे झाल्याने छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. त्यामुळे पडलेल्या या भेगांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी. यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष देणार का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.






























































