Sindhudurg News – देवगडमधील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड येथील बीएसएनएल कार्यालयातील चोरी प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी देवगड पोलिसांसमोर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींविरोधात देवगड पोलीस स्थानकात बीएनएस कलम 305, 331 (3), 331 (4) हा अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत संचार निगम लिमिटेड देवगड येथे 25 सप्टेंबर 2025 रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी 28,800 रुपये किंमतीचे एलसीसी कार्ड आणि कंट्रोल कार्ड चोरून नेले. याप्रकरणी सुधाकर शिवमूर्ती हिरामणी यांनी देवगड पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, संतोष भालेराव हे करीत होते.

दरम्यान, दोडामार्ग पोलीस ठाणे येथे शंकर तायप्पा घोरपडे, आणि बाबा शंकर घोरपडे यांनी दोडामार्ग येथील बीएसएनएल विभागाचे कार्यालयात अशाच प्रकारची चोरी केलेली होती. या आरोपींनी 1 एप्रिल 2026 रोजी दोडामार्ग पोलीस ठाणेकडून अटक करण्यात आलेली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली, घनश्याम आढाव यांचे विशेष सुचनेप्रमाणे तसेच, पोलीस निरीक्षक शाम बुवा यांचे मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व तपास पथकातील सपोउपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणपती गावडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक जाधव, प्रसाद आचरेकर, रविंद्र महाले यांनी वरील आरोपीना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत आरोपींनी देवगड येथील बीएसएनएल विभागाचे कार्यालयात चोरी केल्याचे कबुल केले आहे. पुढील तपास देवगड निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.