Sindhudurg News – कोरजाई माळरानावर विमान कोसळले

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ परिसरात प्रवाशांनी भरलेले विमान कोसळले. घटनास्थळी तत्काळ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा बोलवण्यात आला. जखमींवर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली. दुर्घटनेनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत यंत्रणांनी सजगता राखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने रंगीत तालीम घेतली.

शुक्रवारी सकाळी 11.30च्या सुमारास चिपी विमानतळाच्या इमर्जन्सी गेटच्या बाहेर कोरजाई माळरानावर विमान कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. घटना घडल्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या चिपी विमानतळाची सुरक्षा तितकीच महत्त्वाची असून, त्यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जात असताना त्याचाच भाग म्हणून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाहणाऱ्या यंत्रणांकडून रंगीत तालीम घेतली गेली.

n विमान कोसळल्यामुळे प्रवासी जखमी झाल्याने तत्काळ रुग्णवाहिका व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जखमींवर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली.

n आपत्ती व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या सर्व यंत्रणांनी अवघ्या 45 मिनिटांत परिस्थिती हाताळली. रंगीत तालीममध्ये विमान कोसळल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण केली जाते.

n तातडीने बचावकार्य, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक कार्यवाही केली जाते. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा सहभागी होत्या.