एक चुटकी सिंदूर; बांगडय़ा, कुंकवाला नकार म्हणजे लग्नाला नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो बाबू…. ओम शांती ओम सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा सुपरहिट डायलॉग. सौभाग्याचं लेणं असलेल्या सिंदूरचे महत्त्व वैवाहितेच्या जीवनात अनन्यसाधारण आहे, असं या डायलॉगमधून सांगण्यात आलं आहे. तसाच काहीसा निकाल गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने दिला आहे.

हिंदू विवाहित महिला हातात बांगडया आणि सिंदूर भांगेत भरण्याच्या विवाह विधी आणि प्रथेला नकार देऊन पतीसोबत लग्न झाले यालाच नकार देत आहे, असे निरीक्षण नोंदवून गुवाहाटी उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.

मुख्य न्यायमूर्ती अजय लांभा आणि न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठाने म्हटले की, हिंदू वधूची चिन्हे असलेल्या साखा (शंखापासून बनवलेल्या बांगडय़ा) आणि सिंदूर भांगेत ठेवण्यास तिच्या असलेल्या स्पष्ट नकाराचा अर्थ असा होतो की, ती पतीसोबत लग्न झालेले आहे हे मान्य करीत नाही. या परिस्थितीत पतीला त्या महिलेसोबत विवाहित असण्याची सक्ती असणे छळच असू शकेल, असे न्यायालयाने 19 जून रोजीच्या आदेशात म्हटले. याआधी या प्रकरणात आसाममधील कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता. पतीशी त्याच्या पत्नीने कोणतेही क्रूर वर्तन केल्याचे आढळलेले नाही, असे सांगत कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट नाकारला. त्यामुळे पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

या जोडप्याचा 17 फेब्रुवारी 2012 रोजी विवाह झाला. 2013 मध्ये पत्नीने पतीचे घर सोडले व पती व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार दाखल केली. उच्च न्यायालयाने पती व त्याच्या नातेवाईकांची या आरोपांतून निर्देष सुटका केली आहे.