सायना, श्रीकांतच्या आशा संपुष्टात; सिंगापूर ओपन स्पर्धा रद्द

शटलक्वीन सायना नेहवाल व अनुभवी खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या आशा बुधवारी संपुष्टात आल्या आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन यांच्याकडून 1 ते 6 जून या कालावधीत आयोजित करण्यात येणारी सिंगापूर ओपन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकआधी ही शेवटची पात्रता फेरी होती. त्यामुळे आता सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत या हिंदुस्थानच्या बॅडमिंटनपटूंचे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंग पावले आहे.

बीजिंग ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच घडले

सायना नेहवाल हिने वयाच्या 18व्या वर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2012 साली लंडन व 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्येही तिचा सहभाग होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवाल हिने कांस्य पदक पटकावत देशाचा झेंडा दिमाखात फडकवला होता. सायना नेहवालने आतापर्यंत 2008 सालापासून तीन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, किदाम्बी श्रीकांतने 2016 सालातील रिओ ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदक जिंकून देण्यासाठी जिवाचे रान केले होते, पण उपांत्यपूर्व फेरीत त्याला हार सहन करावी लागली होती.

अजूनही संधी पण…

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सिंगापूर ओपन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली नाही. मात्र या फेडरेशनकडून पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्रता फेरीच्या आयोजनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना ऑलिम्पिक प्रवेशासाठी आणखी एक संधी मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे. पण 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या नाही तर मग छोटय़ाशा अवधीत पात्रता फेरी कशी काय घेण्यात येऊ शकते, असाही प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या