गायिका सुषमादेवी यांना कुटुंबासह घेतले दत्तक, डॉ. रवींद्र जाधव यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लावीलं रमानं… साधीभोळी होती माता रमाई अशी अनेक भीमगीते आयुष्यभर गाऊन आंबेडकरी चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या जुन्या काळातील गायिका सुषमादेवी मोटघरे यांची सध्याची परिस्थिती अशी बिकट आहे. सुषमादेवी यांच्या मदतीला पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व डीएमसीटी हॉस्पिटल कम वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. रवींद्र जाधव हे धावून आले आहेत. सुषमादेवी यांना त्यांच्या कुटुंबासह त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या औषधोपचाराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूही देणार असून त्यांची सर्व काळजी घेतली आहे.

1980च्या दशकात प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या खडय़ा आवाजाने आंबेडकरी चळवळीचा काळ गाजवला. याच काळात कल्याण पूर्वेतील गायिका सुषमादेवी मोटघरे यांनी असंख्य गाणी गायली. पतीदेखील सुषमादेवी यांना कार्यक्रमात हार्मोनियमची साथ करायचे, पण त्यांनाही हृदयाचा आजार जडला आहे.डॉ. रवींद्र जाधव यांनी त्यांच्या झोपडीवजा घराला भेट दिली. एवढेच नव्हे तर मोटघरे यांना गरजेच्या वस्तूही दिल्या. दर महिन्याचे रेशन देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या संघटक भारती जाधव, शोभा केदारे, प्रणाली बागडे, वैशाली खांडेकर, आदेश तांबे, समीर पगारे, अनुजा केमलकर, बाळू रायते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कलाकार कुटुंबास संगीताचे क्लास काढण्यासाठी मदत केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला
डॉ. रवींद्र जाधव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंबेडकरी चळवळीतील गायिका सुषमादेवी मोटघरे व त्यांच्या कुटुंबीयाच्या मदतयज्ञात इतरांनाही सहभागी होता यावे म्हणून जाधव यांनी खास व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. ज्यांना मदत करायची असेल त्यांनी डॉ. रवींद्र जाधव यांच्याशी 9833155731 या मोबाईल क्रमांकावर संपर्प साधावा.