
हिंदुस्थानी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी. गुकेशवर मात केली आणि थेट लाईव्ह जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर झेप घेतली. या विजयासह प्रज्ञानंद अमेरिकेच्या लेव्होन अरोनियनसोबत संयुक्त अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अरोनियनने सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोववर विजय मिळवला होता. पहिल्या फेरीतील इतर सामन्यांत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने पोलंडच्या डुडा जान-क्रिजस्टोफविरुद्ध बरोबरी साधली. वाइल्ड कार्डद्वारे सहभागी झालेल्या सॅम्युअल सवियनने अमेरिकेच्याच वेस्ली सोसोबरोबर गुण वाटून घेतले. फ्रान्सच्या मॅक्सिम वशिए-लाग्रेव्हने आपल्या देशबांधव अलीरेझा फिरौजाविरुद्ध बरोबरी केली. स्पर्धेत अजून आठ फेऱया बाकी आहेत. प्रज्ञानंद आणि अरोनियननंतर सहा खेळाडू संयुक्तरीत्या तिसऱया स्थानावर आहेत, तर गुकेश आणि अब्दुसत्तोरोव अजूनही गुणफलकावर खाती उघडू शकलेले नाहीत. गुकेशविरुद्ध पांढऱया मोहऱयांनी खेळताना प्रज्ञानंदने संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि फक्त 36 चालींत विजय मिळवला.




























































