मुलांचे भविष्य घडवण्यासाठी अर्धांगवायू असूनही ई-रिक्षा चालवून कुटुंबाचे पोट भरणारी ‘सविता’!

बदलता काळ आणि परिस्थितीनुसार माणसाची स्वप्नंही बदलत जातात. हरियाणातील सिरसा येथे राहणाऱ्या आणि आपली मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या एका महिलेलाही आयुष्यात आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली मोठी स्वप्ने  बाजूला ठेवून रिक्षा चालवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सिरसा गावात ई-रिक्षा चालवणारी ही पहिली महिला आहे.

हरियाणातील सिरसा गावात राहणाऱ्या सविताचे लग्न आई-वडिलांनी करून दिले. लग्नानंतर काही दिवसांतच सासरकडच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. सविताला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांना घेऊन ती बहादूरगढ येथील तिच्या माहेरी आली. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिला घरात घेण्यास विरोध केला. 2017 साली तिचा अपघात झाला. त्यामध्ये तिला अर्धांगवायूचा झटका आला. कोरोना लॉकडाऊनमुळे ती सविता करत असलेले नेहमीच काम बंद पडले. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाकरिता तिने ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

अर्धांगावयूने आजारी असलेली सविता ई-रिक्षा चालवून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचे पोट भरते. तिची एक मुलगी इयत्ता नववीत शिकत असून दुसरी मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे. ती सांगते की, सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून मुलांना घेऊन सासर सोडलं. माहेरीही माझे वडील, भाऊ कोणीच माझ्या मदतीकरिता पुढे आले नाही. त्यांना मी कुठे राहते हेही माहित नव्हते, पण शेतकऱ्यांकरिता प्रसिद्ध होणाऱ्या एका वर्तमानपत्रात माझ्याविषयी माहिती छापून आली होती. तेव्हा माझ्या माहेरच्यांना माझा शोध लागला, पण ते मला भेटायला आले नाहीत. माझ्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मी खानावळ चालवत होते, पण ती लॉकडाऊनमुळे ते काम बंद पडले. म्हणून ई-रिक्षा चालवण्याचे काम करायला सुरुवात केली.

एक अर्धांगवायू झालेली महिला रिक्षा चालवते, हे बघून लोकांना आश्चर्य वाटते. ते माझ्याकडे बघत राहतात, पण मला काहीच फरक पडत नाही. कारण मी माझ्या मुलांच्या भविष्याकरिता ही मेहनत घेत आहे. शिवाय इतर ई-रिक्षाचालकही मला या कामात मदत करतात. मला कोणीही या कामाकरिता विरोध करत नाहीत. संकटांना शरण न जाता त्यावर मात कशी करायची ? हे मला माझ्यावर ओढवलेल्या वाईट परिस्थितीने शिकवलं आहे, असे सविता सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या