बहिणींच्या वेड्या मायेनेच त्यांना बनवले ’सुपरस्टार’, सचिनला पहिली बॅट मोठी बहीण सवितानेच दिली

भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण आज रक्षाबंधनाच्या माध्यमात देशभरात उत्साहात साजरा झाला. क्रिकेटमध्येही वेडय़ा बहिणींच्या वेडय़ा मायेनेच टीम इंडियाच्या पाच क्रिकेटपटूंना सुपरस्टार बनवले आहे. बहिणींची साथ नसती तर कदाचित ते क्रिकेटविश्वात मोठा पराक्रम करूही शकले नसते. हिंदुस्थानी चॅम्पियन्सच्या या स्टार बहिणींची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. अपयशानंतर क्रिकेट सोडून पॅनडात गेलेल्या आपल्या भावाचे क्रिकेटमधील कौशल्य जाणून हरभजन सिंगच्या बहिणींनी त्याला आग्रह करीत पुन्हा क्रिकेटमध्ये आणले आणि हिंदुस्थानला एक जगद्विख्यात ऑफस्पिनर मिळाला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरला घडवण्यात त्याची सावत्र मोठी बहीण सविता हिचा सिंहाचा वाटा आहे. सचिननेही अनेक विश्वविक्रम केल्यावर त्याचे श्रेय अनेकदा आपली मोठी दीदी सविताला दिले आहे. आपल्या लाडक्या भावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खेळी करावी अशी प्रार्थना करीत सविता त्याच्या प्रत्येक लढतीप्रसंगी निर्जळी उपवास करायची. 200व्या कसोटी लढतीप्रसंगी सचिनने आपल्या या लाडक्या बहिणीनेच प्रथम आपल्याला कश्मिरी विलो क्रिकेट बॅट भेट म्हणून दिल्याचे सांगितल़े

पितृछत्र हरपल्यावर भावना विराटच्या पाठीशी उभी राहिली

विराट कोहली 18 वर्षांचा असताना 2006 मध्ये त्याच्या वडिलांचे ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. या आघाताने विराट पार खचला होता, पण मोठी बहीण भावना आपल्या या गुणी भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. प्रसिद्धी आणि झगमगाटापासून सतत दूर राहत भावना कोहलीने विराटचे सर्व हट्ट पुरवले आणि त्याला जागतिक क्रिकेटमधील सुपरस्टार बनवले. आजही विराट क्रिकेटमध्ये व्यस्त असताना कर्तव्य म्हणून त्याची बहीण भावना त्याचा  व्यवसाय सांभाळत आहे.

वडिलांचा विरोध पत्करून जयंतीने धोनीला साथ दिली

विश्वविजेत्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही क्रिकेटपटू म्हणून स्टार बनवण्यात त्याची बहीण जयंतीचा सिंहाचा वाटा आहे. माहीने क्रिकेटपटू बनू नये असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण आपल्या भावाचे कर्तृत्व ओळखत बहीण  जयंती त्याच्या पाठीशी  उभी राहिली. शिक्षिका असणाऱया जयंतीमुळेच महेंद्रसिंह धोनीच्या रूपात क्रिकेट जगताला एक धडाकेबाज फलंदाज, चतुर यष्टिरक्षक आणि ‘पॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा महान खेळाडू मिळाला.

बहीण रिषभची सावली बनली

टीम इंडियाचा यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याच्या वडिलांच्या निधनानंतर मोठी बहीण साक्षी त्याच्या पाठीशी सतत सावलीसारखी राहिली. तिने राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱया रिषभचे मनोधैर्य सतत वाढवले.