एसआयटी चौकशीत मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश, 80 रुपयांत एक मत खाल्ले! डेटा ऑपरेटरने तब्बल 6018 नावे कापली!!

कर्नाटक सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीतून मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश झाला आहे. 2023 च्या निवडणुकीआधी येथील आळंद विधानसभा मतदारसंघात तब्बल 6018 मतदारांची नावे कापण्यात आली. एका डेटा सेंटरमध्ये बसून काही डेटा ऑपेरटर्सनी हे कांड केले. अवघ्या 80 रुपयांच्या बदल्यात त्यांनी एक मत खाल्ले. त्यातून डेटा ऑपरेटर्सना एकूण 4 लाख 80 हजार रुपये मिळाले. मतांच्या ‘सेल’चा हा झोल चव्हाटय़ावर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा संशयाचे मळभ दाटले आहे.

भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आळंद मतदारसंघाचा दाखला दिला होता. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. आळंद येथील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 6018 मतदारांच्या नावांची चौकशी करण्यात आली. त्यातील केवळ 24 मतदारांचे अर्ज योग्य असल्याचे आढळले. दुसरीकडे वास्तव्यास गेल्यामुळे त्यांनी नाव वगळण्यासाठी अर्ज केले होते, मात्र, इतर नावांचा घोळ कायम होता.

n एसआयटीने तपास हाती घेतल्यानंतर कलाबुरागी जिह्याच्या मुख्यालयातील डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केले. याच सेंटरमधून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अश्फाक, मोहम्मद अक्रम व इतर तिघे असल्याचे समोर आले. अश्फाक व अक्रम हे दोघे डेटा सेंटर चालवत होते व अन्य तिघे ऑपरेटर्स म्हणून काम करत होते. पोलिसांनी या सर्वांचे संगणक व इतर वस्तू ताब्यात घेतल्या. नावे वगळण्याचे अर्ज करण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉपही जप्त करण्यात आला.

धागेदोरे भाजप नेत्यापर्यंत

लॅपटॉप आणि इतर रेकॉर्डस्च्या तपासानंतर भाजपचे नेते सुभाष गुत्तेदार यांच्याविषयी पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी एसआयटीने गुत्तेदार, त्यांची दोन मुले हर्षनंदा व संतोष आणि त्यांच्या सीएचे घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यातून पोलिसांनी 7 लॅपटॉप, मोबाइल फोन जप्त केले आहेत. डेटा ऑपरेटर्सना देण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय याचा शोध आता एसआयटी घेत आहे.

75 वेगवेगळय़ा मोबाइल नंबर्सचा वापर

मतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्ज करण्यासाठी तब्बल 75 वेगवेगळय़ा मोबाइल नंबर्सचा वापर करण्यात आला. हे नंबर निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यात आले. पोल्ट्री फार्ममधील कामगारांपासून ते पोलिसांच्या नातेवाईकांच्या नावावर हे मोबाइल नंबर आहेत, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. ओळखपत्रे बनावट असताना आयोगाच्या पोर्टलवर मोबाइल क्रमांक कसे स्वीकारले गेले, याचाही तपास सुरू आहे.

n एसआयटीला भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या घराजवळ मतदारयाद्यांची कागदपत्रे जळालेली आढळली. पुरावे नष्ट करण्यासाठीच ही कागदपत्रे जाळली गेली असावीत, असा एसआयटीला संशय आहे. गुत्तेदार यांनी मात्र साफसफाई करताना नोकरांनी ही कागदपत्रे जाळली. याचा यादीतील घोळाशी संबंध नाही, असा दावा केला.