
शिरूर महसूल विभागाने चिंचणी येथील घोड धरणात अवैध वाळूउपसा करणाऱ्या सहा यांत्रिकी बोटी व आठ फायबर बोटी स्फोटाने उडविल्याची चर्चा सुरू तालुक्यात आहे. परंतु ही कारवाई नक्की झाली की फक्त हा दिखावा आहे? अशी चर्चाही शिरूर तालुक्यात असून, ही कारवाई होऊन २४ तास झाले तरी याबाबत महसूल विभागाने गुप्तता का बाळगली? त्यामुळे संशय व्यक्त होत आहे.
शिरूर तालुक्यातील चिंचणी परिसरात शिरूर महसूल विभागाच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने कारवाई केली असल्याची चर्चा आहे. या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारवाईनंतर वाळूउपसा करणाऱ्या सहा यांत्रिक बोटी व आठ फायबर बोटी या पथकाने उडविल्याची चर्चा आहे.
कारवाईबाबत महसूल विभागाने गुप्तता का पाळली? याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. अनेक महिन्यांपासून या भागात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. त्यावेळी महसूल विभाग गप्प का होता? आता याच महिन्यात दोन वेळा या भागात कारवाई झाल्याची चर्चा आहे. परंतु दोन्ही वेळा महसूल विभागाने या कारवाईबाबत गुप्तता पाळली; परंतु कारवाईनंतर याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना का दिली नाही? यात काहीतरी काळेबेरे आहे म्हणून तर या कारवाईची कुठे वाच्यता केली नाही ना? अशीही चर्चा शिरूर तालुक्यात आहे.
वाळूमाफियांच्या बोटी उडविण्याची कारवाई कौतुकास्पद आहे; परंतु याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती का दिली जात नाही? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात झालेली कारवाई म्हणजे वाळूमाफिया आणि महसूल विभाग यांच्या संगनमताने केलेला फार्स आहे का? अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दरम्यान, महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला महसूल विभागाने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करीत चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर बोटी स्फोटकांनी उडवून दिल्या. शिरूर, तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केला होती. न्हावरे येथील मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगत तीन ठिकाणी घोड नदीपात्रात पथक उतरविले. या पथकाने स्वयंचलित बोटींच्या साहाय्याने पाठलाग करीत वाळूमाफियांच्या यांत्रिक बोटी गाठल्या. या पाठलागाचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक व दोन फायबर बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उडवून देण्यात आल्या होत्या.