
ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी भागात सहा कुत्र्यांना विष देऊन ठार करण्यात आल्याची भयानक घटना घडली आहे. या घटनेची माहिती तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना रविवारी दिली.
भिवंडी येथे राहणाऱ्या मनीषा पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांना 21 फेब्रुवारीच्या सकाळी उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. मनीषा पाटील यांच्यासह त्याच परिसरातील इतर तीन रहिवासी काशिनाथ रावते, दिनेश जाधव, आणि रविंद्र रावते यांनीही त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. त्याच दिवशी आणखी एका भटक्या कुत्र्याचाही इतर कुत्र्यांसारखाच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
सहा कुत्र्यांमध्ये दोन लॅब्राडॉर आणि एक जर्मन शेफर्ड यांचा समावेश आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे कुण्या अज्ञात व्यक्तीने कुत्र्यांना विष दिले आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय दंड संहिता कलम 428 (कोणत्याही प्राण्याला मारणे, विष देणे, अपंग करणे किंवा निरूपयोगी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.





























































