
मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहीम अशा सहा किल्ल्यांचे लवकरच संवर्धन होणार आहे. या किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्याची सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील गड-किल्ल्यासंदर्भातील अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या वेळी मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा एकत्रितपणे तयार करण्याची सूचना त्यांनी केली.
सागरी किल्ल्यांचाही विकास होणार
याशिवाय राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण 60 किल्ल्यांचा विकास आराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसांत सादर करावेत. लातूर जिल्हय़ातील औसा आणि उदगीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच राज्यातील 18 संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची काय कामे करण्यात येत आहेत, याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

























































